ब्लड कॅन्सरवर Made In India थेरिपी सापडली! राष्ट्रपतींची मुंबईत घोषणा; करोडो रुपयांचे उपचार काही लाखात शक्य

First Made In India CAR-T Therapy For Cancer: जगभरामध्ये ब्लड कॅन्सरवरील ही थेरिपी सर्वात महागड्या कॅन्सर थेरिपीपैकी एक आहे. मात्र आता भारतीय कंपनीने आयआयटी मुंबईच्या मदतीने तयार केलेल्या मेड इन इंडिया पद्धतीमुळे अनेक गरीब रुग्णांना याचा फायदा होणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 5, 2024, 06:06 PM IST
ब्लड कॅन्सरवर Made In India थेरिपी सापडली! राष्ट्रपतींची मुंबईत घोषणा; करोडो रुपयांचे उपचार काही लाखात शक्य title=
राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडला सोहळा (फोटो राष्ट्रपतींच्या ट्वीटर हॅण्डलवरुन साभार)

First Made In India CAR-T Therapy For Cancer: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यंच्या हस्ते गुरुवारी मुंबईतील इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी म्हणजेच आयआयटीमध्ये स्वदेशी निर्मिती असलेल्या कॅन्सर नियंत्रक रिसेप्टर टी-सेल (कार-टी) थेरीपीअंतर्गत येणाऱ्या नेक्सकार 19 थेरीपीचं लॉन्चिंग केलं. यावेळेस बोलताना राष्ट्रपती मूर्मू यांनी हे स्वदेशी बनावटीचं तंत्रज्ञान भारतात उपलब्ध करुन देणं ही कॅन्सरविरोधी लढाईतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे असं म्हटलं. तसेच शैक्षणिक संस्था आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी एकत्र येऊन अशी सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचंही विशेष कौतुक द्रौपती मूर्मू यांनी केलं. राज्यपाल रमेश बैसही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कशासाठी वापरली जाते ही थेरिपी?

अमेरिकेमध्ये शोधण्यात आलेली कायमेरिक अँटिजेन रिसेप्टर टी-सेल (कार-टी) थेरिपी कॅन्सरवर फार प्रभावी मानली जाते. भारतात जैवतंत्रज्ञान म्हणजेच बायो सायन्स क्षेत्रात काम करणाऱ्या मुंबईतील इम्युनोॲक्ट कंपनीने या थेरिपीचं स्वदेशी रूप विकसित केलं आहे. कार-टी थेरिपीचा वापर प्रामुख्याने ब्लड कॅन्सरवरील उपचारासाठी केला जातो. मागील काही काळापासून या थेरिपीचा वापर जगभरामध्ये वाढताना दिसत आहे. स्वयंप्रतिकारक रोग आणि ब्रेन कॅन्सरवरही या थेरिपीचा वापर करुन उपचार केले जातात.

राष्ट्रपती म्हणाल्या 90 टक्के स्वस्त थेरिपी

कार-टी थेरपी ही सध्या वैद्यकीय विज्ञान क्षेत्रातील सर्वात आधुनिक उपचारपद्धत मानली जाते. मागील काही काळापासून विकसित देशांमध्ये ही उपचारपद्धती उपलब्ध आहे. मात्र हे उपचार फार महागडे असून जगभरातील बहुतांश रुग्णांना हे उपचार घेता येत नाहीत. मला जेवढं समजलं आहे त्यानुसार आज लॉन्च केलेली ही थेरिपी जगात कुठेही उपलब्ध असलेल्या थेरिपीपेक्षा 90 टक्के अधिक स्वस्त आहे. ही जगातील सर्वात स्वस्त कार-टी सेल थेरिपी आहे. तसेच या थेरिपीकडे 'मेक इन इंडिया' धोरणातून तयार झालेली निर्मिती म्हणूनही पाहता येईल. ही थेरिपी म्हणजे आत्मनिर्भर भारताचं चकाकतं उदहारण आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांनी यावेळी आपल्या भाषणात म्हटलं.

जागतिक स्तरावर भारताचं नाव घेतलं जाईल

कार-टी थेरपीचं स्वदेशी स्वरुप लॉन्च होणी देशासाठी, देशातील कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मोठं यश आहे, असं मत आयआयटी मुंबईचे निर्देशक प्राध्याप शुभाषिश चौधरी यांनी व्यक्त केलं. या थेरिपीमुळे सेल आणि जेनेटिक थेरिपीच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचं नाव घेतलं जाईल असंही चौधरी यांनी म्हटलं.

फार कमी किंमतीत अनेकांचा जीव वाचवता येईल

टाटा मेमोरिअल सेंटरचे निर्देशक डॉक्टर सुदीप गुप्ता यांनी, 'कार-टी सेल थेअरपीच्या या प्रोडक्टमुळे अनेकांचे जीव वाचवता येतील. भारताबाहेर उपलब्ध असलेल्या या थेरिपीच्या अनेक पटीने स्वस्तात हे काम नव्याने लॉन्च करण्यात आलेल्या थेरिपीच्या माध्यमातून करता येईल. भविष्यात आम्ही एकत्र काम करुन आम्ही इतर प्रकारच्या कॅन्सर रुग्णांना उपयोगी ठरतील असा सेल आणि जेनेटीक थेरिपी तयार करु अशी अपेक्षा मी करतो,' असं मत व्यक्त केलं.

कोणी तयार केली आहे ही थेरिपी?

देशातील औषध नियामकांनी मुंबईमधील इम्युनोॲक्ट कंपनीने उत्पादित केलेल्या नेक्सकार 19 या थेरिपीच्या वापराला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मान्यता दिली. नेक्सकार 19 ही कार-टी थेरपी इम्युनोॲक्ट कंपनीचे संस्थापक प्राध्यापक राहुल पुरवार यांनी आयआयटीमधील बायो सायन्स आणि बायो इंजनिअरिंग विभागांच्या मदतीने तयार केली आहे. आपल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने प्राध्यापक राहुल पुरवार यांनी स्थापन केलेल्या इम्युनोॲक्ट कंपनीच्या माध्यमातून ही थेरिपी तयार करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरमधील डॉक्टरांनीही मदत केली आहे.

यशस्वी क्लिनिकल ट्रायलनंतर ही थेरिपी आता सर्वांसाठी उपलपब्ध करुन देण्यात आली आहे. आतापर्यंत इम्युनोॲक्टकडून सध्या देशभरातील रुग्णालयांमध्ये दरमहा सुमारे 2 डझन रुग्णांना हे उपचार दिले जात होते. या स्वदेशी बनावटीच्या थेरिपीमुळे रुग्णांना मोठा फायदा होण्याची चिन्हे आहेत. तसेच उपचारांवरील खर्चही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

नेमकं काय केलं जातं या थेरिपीमध्ये?

कार-टी थेरिपीमध्ये एखाद्या व्यक्तीचे रक्त घेऊन त्यातील रोगप्रतिकारक घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टी सेल्स (पेशी) वेगळे केले जातात. प्रयोगशाळेत या सेल्समध्ये जेनेटीक बदल केल्या जातात. सेल्समध्ये निष्क्रिय विषाणू सोडला ज्या माध्यमातून त्या सेलच्या कव्हरवर कार हे विशेष प्रकारचे रिसेप्टर तयार होतात. जेनेटिकली मॉडीफाय केलेल्या हे कार-टी सेल पुन्हा रुग्णाच्या शरीरात सोडल्यात जातात. कॅन्सर सेल्सकडे हे सेल्स आकृष्ट होतात. नंतर हे सेल्स कॅन्सर सेल्सला संपवतात.

नेमका किती खर्च येतो या थेरिपीसाठी अमेरिकेमध्ये?

जागतिक पातळीवर उपलब्ध कार-टी उपचारांपेक्षा भारतीय बनावटीच्या या थेरिपीचा खर्च केवळ एक दशांश इतका आहे. नेक्सकार 19 चा उपचार घेण्यासाठी जगभरातील इतर देशांमध्ये 30 ते 40 हजार डॉलरचा खर्च येतो. अमेरिकेत 2017 साली पहिल्यांदा या थेरिपीला मान्यता मिळाली होती. या थेरिपीच्या माध्यमातून उपचार करण्याचा खर्च सध्याच्या घडीला 3 लाख 70 हजार डॉलर ते 5 लाख 30 हजार डॉलर आहे. म्हणजेच 3 भारतीय चलनानुसार या थेरिपीसाठीचा खर्च 3 कोटी 8 लाख रुपयांहून अधिक आहे. हाच खर्च आता 10 टक्क्यांपेक्षा होणार आहे.