Valentine's Day Party साठी जोडीदार शोधा; शैक्षणिक संस्थेची नोटीस चर्चेत

नोटीसमध्ये विद्यार्थ्यांनी 14 फेब्रुवारीपर्यंत डेट करण्यासाठी जोडीदार शोधावा असे निर्देश विद्यार्थ्यांना देण्यात आले असून याचा नेमका काय फायदा विद्यार्थ्यांना होणार यासंदर्भातील उल्लेखही करण्यात आला आहे

Updated: Jan 13, 2023, 09:30 AM IST
Valentine's Day Party साठी जोडीदार शोधा; शैक्षणिक संस्थेची नोटीस चर्चेत title=
Valentine Day Aakash Institute Notice (Photo- Reuters क्ष Twitter)

Valentine's Day: फेब्रुवारी महिना म्हटलं की आधी डोक्यात येणारी गोष्ट म्हणजे 14 फेब्रुवारी (14th February) अर्थात व्हॅलेंटाइन्स डे. प्रेमाचा दिवस म्हणून जगभरामध्ये साजऱ्या होणाऱ्या दिवशी लोक आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल प्रेम व्यक्त करतात. आपल्या जोडीदारावर आपलं किती प्रेम आहे हे अधोरेखित करण्याचा हा दिवस दरवर्षी या ना त्या करणाने चर्चेत असतो. अगदी आठवडाभर सेलिब्रेशन चालणाऱ्या या दिवसाबद्दल तरुणाईमध्ये विशेष उत्सुकता असते. मात्र आता टीनएजर म्हणजेच कॉलेज तरुण-तरुणींबरोबरच उच्च माध्यमिकमधील मुलांमध्येही या दिवसाची क्रेझ वाढताना दिसत आहे. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीसाठी काहीतरी खास करावं असा विचार अगदी 11 वी आणि 12 मधील विद्यार्थीही करताना दिसतात. अनेक कॉलेज आणि शाळांमध्ये तर व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त शैणक्षिक संस्था कठोर नियम लागू करुन असल्या सगळ्या गोष्टी नको त्या वयात करु नये याबद्दल जागृक असतात. शाळा, कॉलेजांमध्ये व्हॅलेंटाइन्स डेला प्रोत्साहन देण्याची पद्धत भारतात तरी दिसून येत नाही. मात्र यंदाच्या व्हॅलेंटाइन्स डेच्या आधी भारतामधील एका शैक्षणिक संस्थेच्या नावे व्हायरल झालेल्या नोटीसमधून वेगळीच भूमिका समोर येत असून हा कथित बदल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

'आकाश इन्स्टीट्यूट'च्या (Valentine Day Aakash Institute Notice) नावाने व्हायरल झालेल्या या नोटीसमध्ये 14 फेब्रुवारीआधी डेटसाठी जोडीदार शोधा असे आदेशच देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास व्हावा या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या 'व्हॅलेंटाइन्स डे पार्टी'साठी जोडीदार शोधावा असंही या व्हायरल नोटीसमध्ये म्हटलं आहे. सध्या ही नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे ही नोटीस 'इम्पॉर्टंट नोटीस' या मथळ्याखाली छापण्यात आली आहे. विशेष म्हणजे अशापद्धतीने जोडीदार शोधल्यास काय फायदा होणार आहे याबद्दलही या नोटीसमध्ये सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे.

'आकाश इन्स्टीट्यूट'च्या या जगावेगळ्या निर्देशांमुळे नेटकरी वेडावले असून वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया या व्हायरल ट्वीटवर नोंदवल्या जात आहेत. 'व्हॅलेंटाइन्स डे पार्टी' ही संस्थेच्या माध्यमातून आयोजित केली जाणार असल्याचा दावा या व्हायरल नोटीसमध्ये करण्यात आला आहे. "सर्वांगीन विकास होण्याच्या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांनी 14 फेब्रुवारीपर्यंत स्वत:साठी डेट (जोडीदार) शोधावा," असा उल्लेख या नोटीसमध्ये आहे. अशापद्धतीने जोडीदार शोधल्याने विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढेल आणि आयुष्यात त्यांना यशस्वी होता येईल असंही म्हटलं आहे. जोडीदार शोधताना जात, रंग, धर्माचा विचार करु नये असा सल्लाही देण्यात आला आहे. 

मात्र या व्हायरल नोटीसवर तारखेचा उल्लेख नाही तसेच खाली कोणाचीही सही नाही. मात्र वृत्तसंस्थेनं नवी दिल्लीमधील 'आकाश इन्स्टीट्यूट'च्या केंद्राशी संपर्क साधला असता आपल्याला या नोटीससंदर्भात कोणतीही कल्पना नाही असं संस्थेकडून सांगण्यात आलं आहे.