७ मेपासून विदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणणार सरकार, इतकं असेल भाडं

एअर इंडियाची ६४ विमानं करणार उड्डाण

Updated: May 5, 2020, 07:27 PM IST
७ मेपासून विदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणणार सरकार, इतकं असेल भाडं title=

नवी दिल्ली : कोरोनाव्हायरसच्या या संकटात भारतातील सुमारे 2 लाख लोकं परदेशात अडकले आहेत. त्यांना परत आणण्याचे काम सरकार सुरू करणार आहे. अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ७ मे ते १३ मे या कालावधीत ६४ विमानांच्या फेऱ्या होणार आहेत. ज्यामध्ये १४ हजार ८०० भारतीयांना परत आणले जाणार आहे. नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवारी ही माहिती दिली. सरकार जेव्हा प्रवासी उड्डाणे सुरू करेल तेव्हा ते टप्प्याटप्प्याने होईल, असेही हरदीपसिंग पुरी यांनी स्पष्ट केले.

विमानातून परत आलेल्यांना भाडे आकारले जाईल. लंडन-दिल्ली विमानाच्या प्रवासाचे भाडे ५० हजार रुपये आहे, तर ढाका-दिल्ली विमानाचे भाडे १२ हजार रुपये आहे. विमान वाहतूक मंत्री म्हणाले की, इतर देशांकडून परत आलेल्या लोकांची तपासणी केली जाईल, त्यांना १४ दिवस आयसोलेशनमध्ये ठेवले जाईल. एअर इंडिया ७ मे ते १३ मे या दरम्यान भारतीयांना परत आणण्यासाठी विमान पाठवेल, अशी माहिती विमान वाहतूक मंत्र्यांनी दिली. त्यानंतर खासगी विमान कंपन्या प्रवाशांना परत आणण्यासाठी त्यांची सेवा देऊ शकतील.

सरकारने म्हटले आहे की, एअर इंडियाची ६४ विमान आणि त्याची सहाय्यक एअर इंडिया एक्सप्रेस १२ देशांमधील अडकलेल्या भारतीयांना परत आणेल. या देशांमध्ये युएई, यूके, अमेरिका, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, मलेशिया, फिलीपिन्स, बांगलादेश, बहरीन, कुवैत आणि ओमानचा समावेश आहे. युएईसाठी १० उड्डाणे होतील. सुमारे दीड लाख भारतीय युएईमध्ये अडकले आहेत. त्याशिवाय अमेरिकेला सात, युकेला सात, सौदी अरेबियाला पाच, सिंगापूरला पाच आणि कतारला दोन विमानं उड्डाण करतील.

प्रवासापूर्वी प्रत्येकाने त्यांची वैद्यकीय तपासणी देखील केली पाहिजे. केवळ अशा लोकांना परत आणले जाईल ज्यात साथीचे कोणतेही लक्षण आढळणार नाहीत, भारतीय दूतावास आणि ज्या देशांमध्ये भारतीय लोक आहेत त्यांचे हाय कमिशन सध्या अडकलेल्या नागरिकांची यादी तयार करीत आहेत. परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना, ज्यांना विशेष विमानाने परत आणले जाईल, त्यांना आरोग्य सेतु अ‍ॅप येथे येताना डाऊनलोड करावे लागेल.