भारतातील पहिला अराजकीय पक्ष ‘ऑल इंडिया ऍनिमल्स पार्टी’ची घोषणा

राजकीय पक्षांनी मूक प्राण्यांच्या हक्काचा जाहीरनाम्यात समावेश करावा

Updated: Oct 5, 2019, 04:06 PM IST
भारतातील पहिला अराजकीय पक्ष ‘ऑल इंडिया ऍनिमल्स पार्टी’ची घोषणा title=

मुंबई : निवडणुका म्हणजे लोकशाही देशामध्ये आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचविण्याचं एक सशक्त व्यासपीठ. याच व्यासपीठाचा वापर करुन मूक प्राण्यांचा आवाज पोहोचविण्यासाठी ‘इन डिफेन्स ऑफ ऍनिमल्स, इंडिया’ (आयडिए) या प्राणिसंस्थेने भारतातील पहिल्या ‘ऑल इंडिया ऍनिमल्स पार्टी’ या प्रतिकात्मक अराजकीय पक्षाची स्थापना केली आहे. या पक्षाची घोषणा आज  संबंधित पक्षाची ध्येयधोरणे, जाहीरनामा आदीं बाबीं सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी संस्थेतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

‘इन डिफेन्स ऑफ ऍनिमल्स, इंडिया’ (आयडीए) ही संस्था गेल्या २३ वर्षांपासून प्राण्यांचे संगोपन, त्यांचे हक्क आणि अधिकार यासाठी कार्यरत आहे. सुज्ञा पाटकर यांनी ही संस्था १९९६ साली स्थापन केली. प्राणी, विशेषत: मोकाट पाळीव प्राण्यांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी क्रौर्य वागणूक, प्राण्यांविषयीचे अज्ञान, प्राण्यांचे होणारे शोषण, काही प्राण्यांना अगदी बलात्कारासारख्या अमानवी प्रसंगाना देखील सामोरे जावे लागते. या साऱ्या बाबी सर्वसामान्य जनतेला कळावेत यासाठी आयडीए संस्थेने ऑल इंडिया ऍनिमल्स पार्टीची स्थापना केली आहे. हा निव्वळ एक प्रतिकात्मक असा अराजकीय पक्ष आहे. अवघा महाराष्ट्र निवडणूकमय झाला आहे. या वातावरणाचा लाभ घेत मुक्या प्राण्यांचा आवाज पोहोचविणे हाच या पक्ष स्थापनेचा उद्देश आहे.   

“आपल्या राज्यघटनेत स्पष्ट केलेले आहे कि माणसांनी प्राण्यांचे हक्क जपले पाहिजेत. त्यांचे रक्षण केले पाहिजे. मात्र अलिकडे काही अशा घटना घडत आहेत की या हक्कांची पायमल्ली होताना दिसते. या प्राण्यांवर अनन्वित अत्याचार होत आहेत. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होतात. या सगळ्यांना पायबंद घातला गेला पाहिजे.” असे आयडीएच्या संस्थापिका सुज्ञा पाटकर म्हणाल्या.

यावेळेस आयडीएने त्यांच्या जाहीरनाम्यात मांडलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे

१. प्रिव्हेन्शन ऑफ क्रूएल्टीज टू ऍनिमल्स ऍक्ट-१९६० या कायद्यातील तरतूदी कालबाह्य झाल्या असून या कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी. याकरिता सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन संसदेत ही दुरुस्ती करण्यासाठी विधेयक संमत करावे.

२. प्राण्यांवर डांबर टाकणे, त्यांना जाळणे, मारणे, त्यांच्यावर गाड्या नेणे इतकंच नव्हे तर या मूक प्राण्यांवर बलात्कार करणे या अमानवी अत्याचारांना आळा घातला जावा.

३. अनैसर्गिक आणि जबरदस्तीने पाळीव प्राण्यांचे, विशेषत: कुत्रा आणि मांजरीचे प्रजनन केले जाते. या प्रजननाद्वारे अनैतिक पद्धतीने पैसे कमावले जातात या प्रकाराला देखील प्रतिबंध करण्यात यावा.

४. अनधिकृत पद्धतीने चालणारे कत्तलखाने बंद करण्यात यावे.

५. कोंबड्या, शेळ्यांची ने- आण करणाऱ्या गाड्यांमधून या प्राण्यांचे प्रचंड हाल होतात. ते टाळण्यासाठी नियमावली तयार करण्यात यावी.

६. मंदिराबाहेर उभ्या असणाऱ्या गायींना प्रमाणाबाहेर चारा दिला जातो. तिला कोंडून ठेवल्याप्रमाणे बांधले जाते. या सर्व प्रकारात गायीचा मालक आणि मंदिराबाहेर गाय घेऊन बसणारे पैसे कमवितात. मात्र त्या गायीला भयानक त्रासाला सामोरे जावे लागते. अशा या मंदिराबहेरील गायींवर तात्काळ बंदी आणली जावी.     

७. उपरोक्त प्राण्यांसंबंधित मागण्यांचा राजकीय पक्षांनी सहानुभूतीपूर्वक विचार करुन आपल्या जाहीरनाम्यात त्यांचा समावेश करावा ही सगळ्याच राजकीय पक्षांना विनंती आहे.

८. अंतिमत: प्राणी हे मूक आहेत मात्र त्यांना देखील भावना आहेत. त्या समजून घ्या त्यांना प्रेमाची वागणूक द्या ते नि:स्वार्थपणे त्याची परतफेड करतात.

या सगळ्या मागण्या पत्रकार परिषदेत मांडल्या गेल्या. या पत्रकार परिषदेस आयडीएच्या संस्थापिका सुज्ञा पाटकर, विश्वस्त डॉ. एच. जी. घनवट, डॉ. नैना आठले, फिझा शाह आदी मान्यवरांनी संबोधित केले.  यावेळी संस्थेतर्फे प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी पथनाट्याद्वारे वाचा फोडण्यात आली.