लखनऊ : Uttar Pradesh Election : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षाला मोठा झटका बसण्याची शक्यता जास्त आहे. मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांची धाकटी सून अपर्णा यादव (Aparna Yadav) या दिल्लीत पोहोचल्या आहेत. आज त्या भाजपमध्ये प्रवेश करु शकतात. त्यामुळे समाजवादी पक्षाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांची धाकटी सून अपर्णा यादव आज भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करु शकतात. सूत्रांनी झी मीडियाला सांगितले की, अपर्णा दिल्लीत पोहोचल्या आहेत. आज त्या भाजपमध्ये प्रवेश करु शकतात. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून मुलायम सिंह यांची सून भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा होती.
अपर्णा यादव यांची भाजपशी बोलणी अंतिम टप्प्यात आल्याने त्या दिल्लीत पोहोचल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अपर्णा यांनी 2017 ची विधानसभा निवडणूक लखनऊच्या कँट मतदारसंघातून लढवली होती, परंतु त्यांना भाजप उमेदवार रिटा बहुगुणा यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. विशेष म्हणजे अपर्णा या मुलायम सिंह यांच्या दुसऱ्या पत्नी साधना यांचा मुलगा प्रतीक यादव यांच्या पत्नी आहेत.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सावत्र भावाच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या वृत्ताचे यापूर्वी खंडन केले होते. हा कुटुंबाचा अंतर्गत मामला असून, मतभेद मिटवले जातील, असे ते म्हणाले होते. तथापि, या प्रकरणाचे बारकाईने निरीक्षण करणाऱ्यांनी झी मीडियाला सांगितले की, अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे आणि बुधवारी अधिकृत घोषणा केली जाईल.
अपर्णाचे पती प्रतीक यादव सध्या राजकारणापासून दूर आहेत. त्यांचा रिअल इस्टेट आणि जिमचा व्यवसाय आहे. 2016 मध्ये प्रतीक आणि अपर्णा यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा सेल्फी व्हायरल झाला होता. अपर्णा यांनी अनेक प्रसंगी पीएम मोदी यांचे कौतुकही केले आहे, त्यामुळे त्या समाजवादी पक्षापासून वेगळे व्हायचे आहे, असे बोलले जात होते.