मुंबई : भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणात आता त्यांची पत्नी आणि मुलगी समोर आली आहे. दोघींनीही डीआयजींकडे तक्रार करत संशयित सेवक आणि इतर काही लोकांवर कारवाईची मागणी केली आहे. दोघांनी त्या ड्रायव्हरचा जबाब कलम 164 च्या अंतर्गत नोंदवण्याची मागणी केली आहे. एक युवती आणि दोन सेवकांवर ब्लॅकमेलींगचा आरोप केला आहे. ज्या लोकांवर संशय आहे अशा व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं आहे.
दैनिक जागरणच्या बातमीनुसार, भय्यूजी महाराज यांची पत्नी आणि मुलगी यांनी डीआयजींसोबत याबाबत चर्चा केली. भय्यू महाराज यांनी घरगुती वादामुळे नाही तर पैसे, फ्लॅट आणि गाडीसाठी ब्लॅकमेलींग होत असल्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.'
'पोलिसांच्या ताब्यात असलेला आधीचा ड्रायव्हर कैलाश पाटीलला या सगळ्या षडयंत्रांची माहिती होती. त्याने सेवक विनायक, शरद देशमुख आणि एका युवतीने रचलेल्या षडयंत्राबाबत जबाब नोंदवला आहे. त्यामुळे त्याचा जबाब कलम 164 च्या अंतर्गत नोंदवण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली आहे.
भय्यूजी महाराज यांनी 12 जूनला त्यांच्याच लायसेंस रिवॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. एकदा जर ड्राइव्हरचा जबाब कोर्टात नोंदवला गेला तर पुन्हा जबाब बदलण्यात त्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नंतर त्याने जबाब बदलला तर त्याला शिक्षा देखील होऊ शकते. त्यामुळे कलम 164 नुसार जबाब नोंदवण्याची मागणी होत आहे.
डीआयजींनी म्हटलं की, पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. संशयितांना नोटीस पाठवून त्यांची चौकशी सुरु झाली आहे. दैनिक जागरणच्या बातमीनुसार, ड्राईव्हर कैलाश पाटील यांनी म्हटलं आहे की, भय्यू महाराज यांना गोळी झाडण्यासाठी मजबूर करण्यात आलं. ज्यामध्ये कोठी क्षेत्रात राहणारी युवती आहे जी महारांजांची सेवा करायची.