मुंबई : इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातल्या कार्यालयांवर आज एनआयए (National Investigation Agency- NIA) आणि ईडीने (ED) छापे सुरू केले आहेत. देशभरातल्या 10 राज्यात हे छापे सुरू आहेत. यामध्ये 100 हून अधिक नेत्यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील कौसर बागेमध्येही कारवाई करत ही छापेमारी करण्यात आली आहे. (big news NIA and ED arrests 100 PFI leaders in nationwide raid )
पुण्यातून दोन जणांना अटक करण्यात आली. कय्यूम शेख आणि पीएफआयचा महाराष्ट्र सचिव रजी अहमद खान अशी दोघांची नावं आहेत. नाशिकमध्ये सुरू असलेल्या दाखल गुन्ह्याअंतर्गत ही अटक झालीय. देशविरोधी कारवाया करण्यात आल्याचा गुन्हा या दोघांवर दाखल आहे.
दहशतवादी कारवाया, टेरर फंडींग, दहशतवाद्यांसाठी ट्रेनिंग कँप आयोजित करणे, बंदी असलेल्या कट्टर संघटनांमध्ये तरूणांची भरती करणे अशा कारणांखाली ही कारवाई केली जात आहे. एनआयएने 100 हून अधिक जणांना अटक करण्यासोबतच डिजिटल गॅजेट्स, कागदपत्र, काही शस्त्र तसंच रोकडही जप्त केलीय.
सध्या हाती आलेल्या माहितीनुसार नवी मुंबईतील दारावे गावातही छापे मारण्यात आले आहे. तर गेल्या 6 तासांपासून मुंबईत छापे सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडियाच्या नवी मुंबईतील कार्यालयावर धाड टाकण्यात आली असून, नेरुळ सेक्टर 23 मधील दारावे गावात असणाऱ्या कार्यालयावर ही कारवाई करण्यात आली आहे.
देशभरातून काय परिस्थिती?
NIA कडून मंगळुरूमध्ये पीएफआय आणि Social Democratic Party of India (SDPI) च्या कार्यालयांवर धाड टाकण्यात आली. इथून दोघांना ताब्यात घेण्यात आलं. तर, कारवाई सुरु असताना सदर संघटनांमध्ये कार्यरत असणाऱ्यांनी याविरोधात आंदोलनं केल्याचं पाहायला मिळालं.