close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नेत्याच्या गाडीनं होमगार्डला ३०० मीटर फरफटत नेलं, जनतेनं शिकवला धडा

उपस्थितांपैंकी काही जणांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली तर काही जणांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला

Updated: Jun 25, 2019, 02:38 PM IST
नेत्याच्या गाडीनं होमगार्डला ३०० मीटर फरफटत नेलं, जनतेनं शिकवला धडा

रेवाडी, हरियाणा : राजकीय नेत्यांचा अरेरावीपणा काही नवीन नाही, पण कधीकधी ही अरेरावी त्यांना भारी पडू शकते. असाच एक किस्सा हरियाणातल्या रेवाडीच्या भाडावास रेल्वे फाटकावर घडलीय. एका एसयूव्ही कारला रस्त्याच्या उलट दिशेनं चालत असताना पाहून ड्युटीवर असणाऱ्या होमगार्डनं गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला. ही गाडी एका भाजपा नेत्याची होती. ही गाडी न थांबताच पुढे निघून जाऊ लागली तेव्हा होमगार्ड गाडीसमोर उभा राहिला... तर गाडी चालकानं गाडी न थांबवता होमगार्डच जवळपास ३०० मीटर अंतरावर फरफटत नेलं. 

ही गाडी भाजपा नेते सतीश खोला यांची होती. उपस्थितांपैंकी काही जणांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली तर काही जणांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला... पाहता पाहता हा व्हिडिओ व्हायरल झालाय. 

मोठ्या हिंमतीनं ड्युटी करणाऱ्या या होमगार्डचं नाव मोनू यादव असं आहे. प्रत्यक्षदर्शींनाही या घटनेनं धक्काच बसला. त्यांनी पुढे होत गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे होमगार्डचा जीव वाचला. जनतेचा संताप पाहून भाजपा नेते तिथून फरार झाले. परंतु, लोकांनी गाडीच्या चालकाला मात्र पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं.

जनतेचं प्रतिनिधित्व करण्याची शेखी मिरवणाऱ्या नेत्यांवर जनतेनंच अंकुश ठेवला तर कदाचित नेत्यांचा असा माज जनतेला पाहावा लागणार नाही, असंच या घटनेवरून म्हणायला हरकत नाही.