"मुंबईत राहूनही रोजगार दिला, आता कोण इथे...", हिंसाचारात शोरुम लुटल्यानंतर बिहारच्या व्यावसायिकाने मांडली व्यथा

मुंबईत राहणारे भाजपा नेते हैदर आजम (BJP Leader Haidar Azam) यांनी बिहारशरीफच्या मुख्य बाजारात 'डिजिटल दुनिया' नावाचं एक इलेक्ट्रॉनिक शोरुम सुरु केल होतं. हिंसाचारात (Bihar Violence) सहभागी झालेल्यांनी या दुकानातील 3 कोटींचा माल लुटला. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर करत व्यथा मांडली आहे.   

Updated: Apr 2, 2023, 03:36 PM IST
"मुंबईत राहूनही रोजगार दिला, आता कोण इथे...", हिंसाचारात शोरुम लुटल्यानंतर बिहारच्या व्यावसायिकाने मांडली व्यथा title=

BJP Leader Haidar Azam on Bihar Violence: बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील बिहारशरीफमध्ये झालेल्या हिंसाचारात एक इलेक्ट्रॉनिक शोरुम लुटण्यात आलं. 'डिजिटल दुनिया' नावाच्या या दुकानात घुसून तब्बल 3 कोटींचा मुद्देमाल लोकांनी लुटून नेला. शोरुममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे. यानंतर शोरुमच्या मालकाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपली व्यथा मांडली आहे. 

हैदर आजम हे 'डिजिटल दुनिया' शोरुमचे मालक आहेत. ते भाजपाचे नेतेही असून सचिव पदावर आहेत. फेसबुकला पोस्ट लिहित ते म्हणाले आहेत की, "बिहार शरीफ (जिल्हा नालंदा) येथे माझ्या डिजिटल दुनिया मॉलमध्ये काही अज्ञात लोकांनी हल्ला करुन सगळा माल लुटून नेला. मुंबईत राहत असतानाही बिहारमधील लोकांना रोजगार देण्याच्या हेतूने मी हा व्यवसाय सुरु केला होता. पण ही घटना पाहिल्यानंतर कोण बिहारमध्ये काम करण्यासाठी येईल?". 

ही पोस्ट शेअर करताना हैदर आजम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना टॅग केलं आहे.

'डिजिटल दुनिया'चे मालक हैदर आझम हे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे राज्य सचिव आहेत. तसंच मौलाना आझाद अल्पसंख्याक वित्तीय विकास महामंडळ लिमिटेडचे ते ​​अध्यक्ष राहिले आहेत. त्यांना महाराष्ट्रात राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला होता. 

मुंबईत राहणाऱ्या हैदर आझम यांचं बिहारमध्ये डिजिटल दुनिया नावाचं शोरुम आहे. त्यांचा लहान भाऊ जावेद आझम हा व्यवसाय सांभाळतो. भाजपाचे माजी मंत्री मंगल पांडे आणि सैय्य शाहनवाज हुसेन यांनी या शोरुमचं उद्धाटन केलं होतं. त्यांचे संपूर्ण बिहारमध्ये एकूण 8 इलेक्ट्रकॉनिक शोरुम आहेत. 

नालंदामध्ये झालेल्या हिंसाचारात लोकांनी त्यांच्या दुकानातील मोबाइल, लॅपटॉप असं सामान लुटून नेलं.