राजस्थानचा रणसंग्राम - राजस्थानचा सम्राट कोण ? - पार्ट १

राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार ?

Updated: Dec 10, 2018, 06:20 PM IST
राजस्थानचा रणसंग्राम - राजस्थानचा सम्राट कोण ? - पार्ट १ title=

रामराजे शिंदे, नवी दिल्ली : वसुंधरा तेरी खैर नही, मोदी तुझसे बैर नही ! या घोषणेतून राजस्थानमध्ये सत्ता परिवर्तनाची झलक दिसून येते. वसुंधरा राजे यांच्या मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. कारणही तसंच आहे. २००३ च्या विधानसभा निवडणूकीत वसुंधरा राजे यांनी सचिन पायलट यांच्या आई रमा पायलट यांचा २७ हजार मतांनी पराभव केला होता. त्यामुळे सचिन पायलट यांनी वसुंधरा राजेंचा पराभव करण्याचा चंग बांधला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे सचिन पायलट यांच्या आग्रहामुळे राहुल गांधी यांनी पहिली सभा झालावाड येथे घेतली. झालावाड-झालरापाटन मतदारसंघाचे आमदार वसुंधरा आहेत तर त्याच मतदारसंघाचे खासदार वसुंधरा याचा मुलगा दुष्यंत सिंग आहे. त्यामुळे आई-मुलाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वसुंधरा राजेंच्या कालावधीत शेतकरी वर्ग नाराज असल्यामुळे त्याचा फटका बसेल असं चित्र आहे. 

शहरी भाग हा भाजपचा मतदार मानला जातो. परंतू राजस्थान फिरताना शहरातील तरूण मोठ्या प्रमाणावर वसुंधरा यांच्यावर नाराज असल्याचा दिसतो. त्यामुळे या निवडणूकीत शहरी भागातही भाजपला फटका बसेल असं दिसतंय. रस्ते तयार केले परंतू शेतकरी आणि बेरोजगार तरूण यांना काय मिळालं, हा प्रश्न आहेच. राजस्थानमध्ये राष्ट्रीय महामार्गाचे अनेक ठिकाणी काम सुरू आहे. चांगले रस्ते बनले आहेत. परंतू ते क्रेडीट केंद्र सरकारचं. नितीन गडकरी यांचं. राज्याचे प्रमुख म्हणून वसुंधरा यांनी काय केलं, असा सवाल मतदार विचारतोय. झालावाड मतदारसंघात वसुंधरा यांच्या विरोधात मानवेंद्र सिंग यांना उमेदवारी दिलीय. मानवेंद्र हे राजपूत आहेत. राजपूत समाजाला मदत करणारे आनंद पाल यांचे वसुंधरा राजे यांच्या सरकारमध्ये एनकाऊंटर झाले. त्यामुळे राजपूत समाज वसुंधरा यांच्यावर नाराज आहे. याचाच फायदा घेण्यासाठी काँग्रेसने मानवेंद्र यांना झालावड मधून उभे केले. मानवेंद्र यांना भेटण्यासाठी झालावाड येथे गेलो. त्याच दिवशी सिद्धू प्रचार सभेला येणार होता. परंतू सिद्धूने सांगितले अचानक सांगितले की, माझ्याकडे वेळ नाही. त्यामुळे मानवेंद्र तणावाखाली दिसून आले. 

एक दिवसापूर्वीच सिद्धू यांच्या सभेत पाकिस्तानचे नारे लागले होते. त्याचा तोटा काँग्रेसला झाला. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने सिद्धूला शांत राहण्यास सांगितलं. त्यावर सिद्धू काँग्रेस हायकमांडवर नाराज झाले आणि नेमकं दुस-याच दिवशी झालावाड मध्ये सिद्धूची रॅली होती. त्याचा परिणाम मानवेंद्र यांच्यावर झाला. मानवेंद्र यांना सकाळी भेटल्यावर त्यांना प्रश्न विचारला की, राहुल गांधी यांनी पहिल्याच भाषणात सांगितलं होतं की, काँग्रेसमध्ये कोणताही पॅराशूट उमेदवार दिला जाणार नाही. मग तुमचा मतदारसंघ वेगळा असताना इथे का उतरवलं गेलं. त्यावर मानवेंद्र म्हणाले की, मी तर मूळ राजस्थानचाच आहे. मात्र वसुंधरा तर मध्य प्रदेशातील आहेत. त्यामुळे बाहेरचा उमेदवार मी नव्हे तर वसुंधरा आहेत. 

झालावाड येथील निवडणूक स्थानिक आणि बाहेरचा उमेदवार कोण याभोवती राहिली. झालावाड मतदारसंघात एकूण २ लाख ७३ हजार मतदार आहेत. त्यात १५ टक्के मुस्लीम, १३ टक्के एससी-एसटी, १२ टक्के राजपूत, ११ टक्के ओबीसी, ७ टक्के ब्राम्हण मतदार आहेत. मुस्लीम भाजपच्या बाजूने नाही. मानवेंद्र यांना उमेदवारी दिल्यामुळे राजपूत मतदार काँग्रेसच्या बाजूने फिरला तर वसुंधरा यांना आपला गड राखणं कठीण होईल. या जातीय गणिताच्या आधारावरच काँग्रेसनं राजपूत नेता मानवेंद्र यांना वसुंधरा यांच्या विरोधात उभे केलंय. परंतू मानवेंद्र यांना तयारी करण्यासाठी केवळ १५ दिवसांचा कालावधी मिळाला. त्यामुळे मानवेंद्र यांची निवडून येण्याची शक्यता कमी आहे. परंतु वसुंधरा राजे मागील निवडणूकीत ६० हजार मताधिक्यानी विजयी झाल्या होत्या. यंदा ते मताधिक्य २० ते २५ हजारावर येईल. परंतू वसुंधरा राजे निवडून येतील.

तिसरी आघाडी, होईल का बिघाडी

हनुमान बेनिवाल आणि घनश्याम तिवारी हे दोघेही कधीकाळी भाजपचे निष्ठावंत होते. परंतू आता भाजपचे कट्टर विरोधी बनले आहेत. हनुमान बेनिवाल यांनी राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी स्थापन केली. त्यात घनश्याम तिवारी यांच्या भारत वाहिनी पार्टीने साथ दिली. दोघांनी मिळून तिसरी आघाडी केली. हनुमान बेनिवाल जाट तर घनश्याम तिवारी ब्राम्हण नेते. जाट आणि ब्राम्हण नेत्याने एकी केली. दोन्ही मतदार भाजपसाठी महत्त्वपूर्ण आहे. हनुमान बेनिवाल यांनी ५७ उमेदवार उभे केले. तर घनश्याम तिवारी यांनी १०० पेक्षा जास्त उमेदवार उभे केले आहेत. हनुमान बेनिवाल २००९ मध्ये भाजपमधून बाहेर पडले. तर घनश्याम तिवारी ५ महिन्यापूर्वीच भाजपमधून बाहेर पडले. घनश्याम तिवारी हे राजस्थान भाजपच्या संस्थापकापैकी एक आहेत. ते ६ वेळा आमदार आणि दोन वेळा मंत्री राहीले. त्यांचा १५ विधानसभा मतदारसंघावर मोठा प्रभाव आहे. तर शेखावटी आणि जयपूर मध्ये दांडगा जनसंपर्क आहे. परंतू वसुंधराच्या सरकारमध्ये सन्मान मिळत नसल्यामुळे नाराज होऊन बाहेर पडले. त्यामुळे भाजपकडे ताकदवान ब्राम्हण चेहरा उरला नाही. तिवारी यांना राजस्थानचं चाणक्य म्हटलं जातं. चाणक्याची ताकद अजून शिल्लक आहे का, हे निकालातून स्पष्ट होईल.

हनुमान बेनिवाल यांच्या मागे जाट समाजातील तरूणवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या सभेला लाखोंची गर्दी होते. प्रत्येक लहान मुलाकडे हनुमान बेनिवाल यांचा मोबाईल नंबर आहे. थेट बेनिवाल यांना संपर्क केला जातो. बेनिवाल सुद्धा रात्रं दिवस लोकांच्या मदतीला धावताना पाहायला मिळतंय. त्यांच्यावर युट्यूबर लोकांनी कविता केल्या आहेत. गाणी लिहली आहेत. युट्यूबवर लाखो हिट्स मिळणारा राजस्थानमधील एकमेव नेता हनुमान बेनिवाल आहे. महाराष्ट्रात एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांचे जसे वर्चस्व होते तसेच वर्चस्व इथे हनुमान बेनिवाल यांनी निर्माण केलंय. बेनिवाल यांचा बाडमेर, नागौर, जोधपूर, बिकानेर, सिकर, चुरू, खिंवसर यासह किमान २० मतदारसंघावर प्रभाव पडेल. हा परिसर जाट लॅण्ड म्हणून ओळखला जातो. टोलमुक्त राजस्थान, कर्जमाफी, मोफत वीज आणि स्वामीनाथन आयोगाचा अहवाल अमलात आणावा, या मुद्द्यवरून बेनिवाल यांनी निवडणूक लढवली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गही बेनिवाल यांच्या पाठीशी येण्याची शक्यता आहे. 

भाजप ''सांपनाथ'' तर काँग्रेस ''नागनाथ'' असल्याचा आरोप बेनिवाल करत आहे. परंतू हनुमान बेनिवाल यांच्या सभेला कोट्यावधीचा खर्च येत आहे. बेनिवाल हेलिकाप्टरमधून दौरे करत आहेत. अशावेळी पैशाचा स्त्रोत काय हा प्रश्न निर्माण होतो. तर बेनिवाल यांचे कट्टर विरोधक आणि भाजपचे मंत्री गजेंद्र सिंग खिंवसर यांच्या विरोधात हनुमान बेनिवाल यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे हनुमान बेनिवाल भाजपची बी टीम तर नाही ना असा संशय येत आहे. बेनिवाल यांनी अनेक ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. तिथे ४-५ हजार मते जरी कमी झाली तरी काँग्रेसला फटका बसणार आहे. बेनिवाल यांच्या पक्षाने ५ पेक्षा अधिक जागा पटकावल्या आणि भाजप - काँग्रेसमध्ये बहुमतासाठी जास्त अंतर नसेल तर बेनिवाल भाजपला पाठींबा देऊ शकतात. अशावेळी लाट विरोधात असली, आकडे नसले तरी भाजप सत्तेवर येऊ शकते. त्यामुळे तिसरी आघाडी आणि बेनिवाल यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हनुमान भाजपसाठी तारणहार ठरतील.

जातीय समीकरण

राजस्थानमध्ये ९ टक्के जाट समाज आहे. ५ टक्के गुर्जर, ६ टक्के राजपूत आणि ७ टक्के ब्राम्हण समाज आहे. राजस्थानमध्ये राजा- महाराजांचे संस्थान खालसा करण्यात काँग्रेसला यश मिळालं. त्यानंतर राजपूत समाजाची वाताहत झाली. त्यामुळे राजपूतांच्या अवस्थेला काँग्रेस जबाबदार असल्याचं अजूनही राजपूत नेत्यांच्या मनात आहे. त्यामुळे राजपूत समाज पारंपारिक पद्धतीने भाजपकडे राहीला. राजपूत समाज भाजपकडे असल्यामुळे जाट समाज काँग्रेसकडे राहीला. कारण जिकडे राजपूत समाज त्या विरोधात जाट समाज उभा असतो. परंतू राज्यात सर्वाधिक जाट समाज आहे.  जाट मतदार कुणीकडे जाणार यावर राजस्थानचं राजकारण अवलंबून आहे. तर योगी आदित्यनाथ यांनी हनुमान दलित असल्याचा मुद्दा काढल्यामुळे दलित समाजात या वक्तव्याचा परिणाम झाला. या वक्तव्यामुळे भाजपचा हिंदू मतदार नाराज झाला नाही तर दलित मतदार भाजपकडे आकर्षित झाला आहे. हनुमान दलित आहे, हा प्राईड दलित समाजात निर्माण झाला. त्यामुळे योगींच्या वक्तव्यामुळे काही प्रमाणात भाजपला फायदा होताना दिसतो. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी पहिलीच प्रचार सभा अल्वर येथे घेतली. अल्वरमध्येच गोरक्षकांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला होता. 

अल्वरमध्ये दलित समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात मोदींनी काँग्रेसवर हल्ला करत काँग्रेसने डा बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केल्याचा आणि आंबेडकरांना भारतरत्न काँग्रेसने दिलं नसल्याचाही मुद्दा काढला. यामुळे दलितांमधील नाराजी कमी करण्याचा प्रयत्न मोदींनी केला. अल्वरमध्ये दोन टोक आहेत. एक कट्टर समर्थक आणि एक कट्टर विरोधक. हिंदू वस्तीत मी विचारलं की राम मंदिर हवं की विकास. त्यांचं म्हणणं आधी राम मंदिर नंतर विकास. तर दलित वस्तीत गेल्यावर त्यांचं म्हणणं आधी विकास नंतर राम मंदिर.

पायलटचं विमान कुणाच्या भरवशावर ?

राजा महाराजांच्या काळात एकमेव मुस्लीम संस्थान राहीलेले टोंक विधानसभामधून काँग्रेसचे भावी मुख्यमंत्री सचिन पायलट उभे आहेत. काँग्रेसने टोंकमधून पहिल्यांदाच हिंदू उमेदवार दिला आहे. पहिल्याच विधानसभा निवडणूकीसाठी पायलट यांनी मुस्लिम बहुल टोंक मतदारसंघ निवडला. त्यांनी २००४ मध्ये दौसा येथून सचिन पायलट यांनी पहिली लोकसभा निवडणूक लढविली. त्यानंतर २००९ मध्ये अजमेर मधून लोकसभा लढविली. तर २०१४ मध्ये अजमेर मधून लोकसभा निवडणूकीत पायलट यांचा पराभव झाला. हा पराभव पायलट यांच्या जिव्हारी लागला. 

टोंक विधानसभामधील जातीय गणित पाहिलं तर मुस्लीम समाजाचं प्राबल्य आहे. एकूण २ लाख २४ हजार मतदार आहेत. त्यापैकी २० टक्के मुस्लीम, १७ टक्के एससी-एसटी, १४ टक्के गुज्जर, ५ टक्के ब्राम्हण, ५ टक्के जाट, ४ टक्के राजपूत, ३ टक्के माळी आहेत. सचिन पायलट गुज्जर आहेत. त्यामुळे १४ टक्के गुज्जर पायलट यांना मदत करेल. त्याशिवाय मुस्लीम मतदार काँग्रेसकडे राहीला आहे. त्यामुळे पायलट यांचा विजय निश्चीत आहे. वसुंधरा राजेंच्या विरोधात काँग्रेसने राजपूत नेता मानवेंद्र यांना उभे केले. त्यामुळे वसुंधराने त्याचा वचपा काढण्यासाठी राजस्थानमधील बांधकाम मंत्री युनूस खान यांना भाजपतर्फे टोंकमध्ये उतरवले. भाजपने राज्यात एकमेव मुस्लिम उमेदवार दिला तोही सचिन पायलट विरोधात. मुस्लिम मतदारांमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. परंतू युनूस खान यांना बळीचा बकरा बनवल्याचीही भाजपमध्ये कुटबूज आहे. विशेष म्हणजे सचिन पायलट आणि युनूस खान हे दोघेही टोंकचे नाहीत. 

केवळ निवडणूक लढवण्यासाठी आणि राजकीय वैरमधून या दोघांना आपला मतदारसंघ सोडून टोंकमधून निवडणूक लढवावी लागत आहे. युनूस खान हे वसुंधरा राजे यांच्या अगदी जवळचे आहेत. वसुंधरा राजें यांचे इतर व्यवहार युनूस खान सांभाळतात. त्यामुळे युनूस खान यांना बळीचा बकरा बनवले असले तरी त्याची शाबासकी त्यांना नंतर दिली जाईल याचंही आश्वासन देण्यात आलं आहे. युनूस खान पाच दिवस फिरून प्रचार करत असेल तर सचिन पायलट एकाच सभेत तेवढे लोक येतात. म्हणजेच युनूस खानचे पाच दिवस तर सचिन पायलटचे दोन तास बरोबर आहेत. अशा परिस्थितीत पायलट यांचा विजय निश्चीत आहे. तसं सचिन पायलट फारसे लोकांमध्ये मिसळणारे नेते नाहीत. परंतू अशोक गहलोत उतरल्यामुळे पायलट यांनाही मेहनत घ्यावी लागतेय. पायलट यांनाही जमीनीवर यावं लागलंय. टोंक मतदारसंघात तरी पायलटचं विमान मुस्लिम समाजाच्या भरवशावर असणार आहे.

ओल्ड इज गोल्ड

राजस्थानमध्ये फिरताना माझे दोन प्रश्न असायचे. एक राज्यात कोण मुख्यमंत्री हवा आणि केंद्रात कोण. त्यावर ९९ टक्के लोकांनी राज्यात अशोक गहलोत हवे आहेत असं सांगितलं तर केंद्रात नरेंद्र मोदी. राजस्थान काँग्रेसमधील सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणजे अशोक गहलोत. गहलोत यांना आपल्या सरदारपूरा मतदारसंघात जास्त फिरण्याची गरज पडली नाही. दोन वेळा मुख्यमंत्री राहीलेले आणि काँग्रेसचे विद्यमान महासचिव अशोक गहलोत सरदारपुरा मतदारसंघातून सलग ४ विधानसभा निवडणूक जिंकले आहेत. या मतदारसंघाचं गणित पाहिलं तर एकूण २ लाख २७ हजार १४१ मतदार त्यात २० टक्के राजपूत, १८ टक्के माळी, ९ टक्के एससी-एससी, ९ टक्के कुंभार-जाट-बिश्नोई, ५ टक्के ब्राम्हण आहेत. माळी समाजाचे असल्यामुळे गहलोत यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे. त्यांच्या विरोधात भाजपने शंभू सिंग खेतासर यांना उभे केले आहे. २०१३ च्या निवडणूकीत अशोक गहलोत यांनी शंभू सिंग यांना १८ हजार ४७८ मतांनी पराभव केला होता. 

चहा टपरीवरील देवेंद्र शरण या तरूणाला विचारलं की, राजस्थान में सीएम कोण चाहिए. यावर तो म्हणाला, अशोक गहलोत. मी म्हणालो का, तर तो म्हणाला, क्योंकी ओल्ड इज गोल्ड. मी पुन्हा म्हणालो लेकीन सचिन पायलट भी आपके जैसे यंग है. त्यावर तो म्हणाला, पायलट तो हवा में रहनेवाला नेता है. हमे जमींन पर रहनेवाला नेता चाहिए. यातून दोन्ही नेत्यांमधील फरक कळाला. अशोक गहलोत यांच्या कामांविषयी बोलताना तरूणाई थकत नाही. शेतकरी, मजूर, व्यापारी गहलोत यांचं कौतुक करतात. गहलोत यांच्याविषयी नकारात्मक ऐकू येत नाही. हीच काँग्रसची जमेची बाजू आहे. राहुल गांधी यांनी झालावाड मध्ये सभा घेतली त्यावेळी सचिन पायलट आणि अशोक गहलोत दोघेही व्यासपीठावर होते. 

राहुल गांधी यांनी मुद्दामहून अशोक गहलोत यांच्याकडे चेहरा करून बोलत बसले. तर सचिन पायलट याच्याशी थोडं अंतर ठेवलं. लोकांना कोणता नेता हवाय हे राहुल गांधी यांना चांगलंच माहित असणार. सचिन पायलट भाषण देण्यासाठी उठल्यानंतर लोकांनी टाळ्या वाजविल्या पण अशोक गहलोत भाषणासाठी उठल्यानंतर सर्व लोक उठून घोषणाबाजी देऊ लागले. सलग ४-५ मिनिट घोषणाबाजी सुरू होती. राजतिलक भल्लालदेवचा होत असला तरी लोकांचं प्रेम बाहुबलीवर होतं, हे दृश्य दाखवणारा तो क्षण होता. लोकनेता म्हणून अशोक गहलोत यांनी लोकांच्या मनात घर केलंय. तर सिल्वर स्पून तोंडात घेऊन जन्मलेल्या सचिन पायलट यांना अजून मातीची नाळ सापडली नाही. त्यामुळे सध्या तरी राजस्थानचा बाहुबली... राजस्थानचा ''सम्राट अशोक''च राहणार यात शंका नाही.