नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतल्या अपयशानंतर अखेर समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी यांची आघाडी तुटलीय. समाजवादी पार्टीचे परंपरागत उमेदवार असलेल्या यादवांची मतं मिळवण्यात अपयश आल्यानेच आघाडीला अल्पविराम देत असल्याचं मायावतींनी जाहीर केलं. भाजपाच्या जातीयवादी राजकारणाला दूर सारण्यासाठी अखिलेश यादव यांनी सपाच्या कार्यकर्त्यांची मानसिकता तयार करण्याची गरज आहे, त्यात ते यशस्वी झाले तर पुन्हा एकत्र येऊ असंही त्या म्हणाल्या. उत्तर प्रदेशात ८० पैकी बसपाचे १० तर समाजवादी पक्षाचे पाच असे १५ उमेदवार निवडून आले. समाजवादी पक्षाच्या तुलनेत बसपाला चांगलं यश मिळालं. तरीही मायावतींनी या युतीला अल्पविराम दिलाय.
लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाची आघाडी अयशस्वी ठरल्यानंतर मायावती यांनी स्वतंत्रपणे उपनिवडणुका लढण्याची घोषणा केली. आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, समाजवादी पक्षात अद्याप अनेक सुधारणा आणण्याची गरज व्यक्त केली. अखिलेश यादव यांनी राजकीय कार्यांसोबतच आपल्या कार्यकर्त्यांना बसपा प्रमाणेच 'मिशनरी मोड'वर आणलं तर भविष्यात हातमिळवणी केली जाऊ शकते, असंही त्यांनी यावेळी अखिलेश यादव यांना उद्देशून म्हटलं.
अखिलेश यादव यांच्या संपूर्ण कुटुंबाचा आम्ही आदर करतो. सपा-बसपाची हातमिळवणी केवळ राजकीय स्वार्थासाठी नाही. आमच्यासोबत त्यांचं हे नातं दीर्घकाळासाठी आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. लोकसभा निवडणुकीत सपाला त्यांची हक्काची मतंही मिळाली नाहीत तर बसपाला कशी मिळाली असती? यादव पक्षानं समाजवादी पक्षाची साथ सोडली. यादवांचं प्राबल्य असलेल्या ठिकाणीही सपाच्या उमेदवारांना पराभूत व्हावं लागलं. बदायू, कन्नौज आणि फिरोजाबाद मतदारसंघात सपा उमेदवारांना पराभूत व्हावं लागणं ही चिंताजनक गोष्ट आहे, असंही यावेळी मायावती यांनी स्पष्टीकरण दिलं.
समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची आघाडी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीतही कायम राहील, असे लोकसभा निवडणुकीआधी जाहीर करणाऱ्या बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सोमवारी स्वबळाचे संकेत दिले. त्यामुळे बसपाची समाजवादी पक्षासोबतची आघाडी तुटल्यातच जमा आहे. ८० पैंकी बसपाचे १० तर समाजवादी पक्षाचे पाच असे १५ उमेदवार निवडून आले. समाजवादी पक्षाच्या तुलनेत बसपाला चांगलं यश मिळालं. समाजवादी पक्षाची यादव ही पारंपरिक मतपेढी हस्तांतरित झाली नाही, असा मायावती यांचा आक्षेप आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या ताकदीवर यश मिळाल्याचं मायावती यांनी सोमवारी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत सांगितले. मायावती यांच्या या विधानावरून त्यांनी समाजवादी पक्षाची मदत झाली नाही, हेच अधोरेखित केले. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या ११ जागांसाठी पोटनिवडणुका होतील. भाजपचे नऊ तर समाजवादी आणि बसपचा प्रत्येकी एक असे एकूण ११ आमदार लोकसभेवर निवडून आले आहेत. पोटनिवडणूक लढण्यासाठी तयारीत राहा, असा आदेशच मायावती यांनी पक्षाच्या नेत्यांना दिला. अखिलेश यादव .यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. जमिनीवर राहून काम केल्यास भाजपाला हरवू शकतो असंही ते म्हणाले.