सोन्याचे दागिने खरेदी करताय? हा नवा नियम जरुर वाचा

सोप्या शब्दांत सांगावं तर...

Updated: Jan 14, 2020, 11:24 PM IST
सोन्याचे दागिने खरेदी करताय? हा नवा नियम जरुर वाचा  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्याच्या विचारात असाल तर काही नव्या नियमांविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण केंद्र सरकारकडून सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्याविषयीचे काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत. १५ जानेवारी २०२०पासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. 

हॉलमार्क असतं तरी काय? 

सोप्या शब्दांत सांगावं तर, तुमच्या दागिन्यांध्ये किती प्रमाणात सोनं आणि किती प्रमाणात इतर धातूचं मिश्रण आहे याचं प्रमाण. ज्यासाठी अधिकृत नोंद ठेवण्यात येते. नव्या नियमांअंतर्गत यापुढे सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असणं बंधनकारक असणार आहे. ज्यासाठी ज्वेलर्स, सोनारांना परवाना घ्यावा लागणार आहे. 

यापूर्वी देशात दागिन्यांवर हॉलमार्क लावणं हे ऐच्छिक होतं. पण, आता हा नियम लागू झाल्यावर मात्र कोणत्याही सोन्याच्या दागिन्याची विक्री होण्यापूर्वी त्यावर हॉलमार्क असणार आहे. याआधी देशात सोन्याच्या दागिन्यांची गुणवत्ता निर्धारित करण्यासाठी कोणतीही संस्था नव्हती. ज्यामुळे काही ग्राहकांना अनेकदा २२ कॅरेटऐवजी २१ कॅरेट किंवा गुणवत्ता कमी असलेलं सोनं विकलं जात होतं. पण, त्यांच्याकडून २२ कॅरेट सोन्याच्याच दराने पैसे आकारले जात होते. 

नियमाचं पालन न केल्यास होणार शिक्षा 

देशातील २३४ जिल्ह्यांमध्ये ८९२ हॉलमार्किंग केंद्र सुरु करण्य़ात आली आहेत. तेव्हा सोनार, ज्वेलर्स यांच्यापैकी कोणाकडूनही ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार आहे. ज्याची शिक्षा न्यायालयाकडून निर्धारित करण्यात येईल. 

सध्याच्या घडीला १ लाख रुपये दंड, जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर पाच टक्के दंड किंवा एका वर्षाचा कारावास किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात असं म्हटलं जात आहे. 

नव्या नियमानुसार सरकार १४ कॅरेट, १८ कॅरेट आणि २२ कॅरेटच्या दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य करेल. ज्यासाठी ४०० ते ५०० नवे असेसिंग सेंटर सुरु होतील. ग्रामीण भागातील सोनारांवर तुर्तास कोणतीही कारवाई होणार नाही. ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यासाठी १ वर्षाचा कालावधी लागणार असल्याचं कळत आहे. हा नवा नियम लागू करत देशातील अनेक लोकांकडे चुकीच्या मार्गाने आलेलं सोनं समोर येण्यास मदत होईल अशी आशा बाळगण्यात येत आहे.