Corona : तिसऱ्या लाटेची चाहूल! सरकारकडून प्रवासासाठीची नवी नियमावली जाहीर

कोणत्या राज्यानं चाचणी अनिवार्य असल्याचा नियम कायम ठेवला तर ... 

Updated: Aug 25, 2021, 10:39 PM IST
Corona : तिसऱ्या लाटेची चाहूल! सरकारकडून प्रवासासाठीची नवी नियमावली जाहीर  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : कोरोनाचा (Corona) कमी जास्त प्रमाणात होणारा प्रादुर्भाव पाहता देशात पुन्हा एकदा काही नियम नव्यानं लागू करण्यात येत आहेत. तर काही नियमांचं पालन करण्याचं आवाहन वारंवार करण्यात येत आहे. देशातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आता देशांतर्गत प्रवासासाठी कोविड चाचणी बंधनकारक नसेल. पण, कोणत्या राज्यानं चाचणी अनिवार्य असल्याचा नियम कायम ठेवला तर मात्र त्यांना याबाबची सूचना प्रसिद्ध करावी लागेल. 

RTPCR बंधनकारक नको 
केंद्रानं दिलेल्या मार्गदर्शक सूचांनुसार हवाई, रस्ते आणि रेल्वे मार्गानं प्रवाशांना कोणत्याही अडचणीशिवाय प्रवास करता येणार आहे. या धर्तीवर विविध राज्यांना निर्देश देण्यात आले असून, त्यांनी लसीकरण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र असणाऱ्या नागरिकांकडे आरटीपीसीआर चाचणीची मागणी करु नये अशा सूचना केल्या आहेत. 

केंद्रानं जारी केलेल्या नव्या सुचनांनुसार ज्या नागरिकांनी कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्या आहेत आणि त्यांना लसीचा दुसरा डोस घेऊन 15 दिवसांचा काळ लोटला आहे त्यांच्याकडून आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट मागू नये. परंतु, राज्यात प्रवेश करतेवेळी कोणत्याही व्यक्तीला तापाची लक्षणं आढळून आल्यास त्या व्यक्तीची मात्र आरटीपीसीआर चाचणी केली जाण्याची  शक्यता आहे. 

भारतात कोरोना हा एन्डेमिक स्टेजवर
भारतात कोरोना हा एन्डेमिक स्टेजवर येण्याच्या मार्गावर असल्याची शक्यता WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केली. जगभरात अनेक ठिकाणी कोरोनाच्या अनेक लाटा येऊन गेल्यात तिथे भारतात मात्र सध्या आणि पुढील काळात कदाचित कोरोना हा सौम्य किंवा मध्यम स्वरुपातल्या संसर्ग स्थितीत असल्याची शक्यता डॉ. स्वामीनाथन यांनी वर्तवली.