नवी दिल्ली: राममंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ४ आणि ५ ऑगस्टला अयोध्येतील सर्व मंदिरे उघडली जाणार आहेत. या दोन दिवसांत अयोध्येत दिवाळीसारखा उत्साह असेल. कालच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येला भेट दिली होती. यानंतर त्यांनी अयोध्येतील सर्व मंदिरांची व्यवस्थितपणे साफसफाई करुन ४ आणि ५ ऑगस्टला प्रत्येक ठिकाणी दिव्यांची आरास करण्याचे आदेश दिले आहेत.
अयोध्येतील भूमिपूजनाला येऊ इच्छिणाऱ्या लाखो रामभक्तांचे काय? उद्धव ठाकरेंचा सवाल
येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराच्या भूमिपूजनचा सोहळा संपन्न होणार आहे. त्यादृष्टीने आता अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कालच या सगळ्या तयारीचा आढावा घेतला होता. यानंतर त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत राम मंदिर ट्रस्ट आणि साधु-संतांशी संवाद साधला. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी म्हटले की, ५०० वर्षांच्या संघर्षानंतर हा शुभ दिन आला आहे. संपूर्ण देश आनंदात असताना आपल्यालाही उत्सव साजरा केला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जंगी स्वागत झाले पाहिजे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाला मोजक्या लोकांनाच आमंत्रित केले जाणार आहे. ५ ऑगस्टला सकाळी साधारण ११ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी अयोध्येत दाखल होतील. यानंतर भूमिपूजनाच्या सर्व विधींना सुरुवात होईल. मात्र, देशभरात कोरोना व्हायरसचा वेगाने फैलाव होत असताना मोदी सरकारने हा सोहळा आयोजितच का केला, असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. या सगळ्यावर आता पंतप्रधान मोदी आणि भाजप काय बोलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.