श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्हयात एका सीआरपीएफ अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मंगळवारी म्हणजेच १२ मे रोजी सीआरपीएफमध्ये उप निरिक्षकपदी सेवेत असणाऱ्या फतेह सिंह यांनी कोरोनाची लागण झाल्याच्या संशयावरुन आत्महत्या केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं. ते मुळचे राजस्थानच्या जैसलमेर येथील रहिवासी आहेत.
सीआरपीएफच्या ४९ बटालियनमधून जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील मथान भागात ते सेवेत रुजू होते. मंगळवारी सकाळी आपल्याजवळ असणाऱ्या रायफलने त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करत जीवन संपवलं. सीआरपीएफशी संलग्न सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. पण, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
सिंह यांच्या आत्महत्येविषयी समोर आलेल्या माहितीत त्यांनी लिलिहेलं एक पत्र लक्ष वेधत आहे. 'मला भीती वाटत आहे. मला कोरोनाची लागण झालेली असू शकते', अस त्यांनी या पत्रात लिहिल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान, सीआरपीफएच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे कोणतेच पुरावे नव्हते. त्यामुळे आता त्यांच्या चाचणीच्या अहवालाचीच सर्वांना प्रतीक्षा आहे.
वाचा : सीमेनजीक चीनच्या खुरापती सुरुच; आता असं काही केलं की.....
कोरोना विषाणूने गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात थैमान घातलं आहे. संपूर्ण जगावरच भीतीचं सावट आणणाऱ्या या विषाणूचा भारतातील संसर्गही दिवसागणिक वाढत चालला आहे. याच धर्तीवर अनेकांमध्ये कमालीची भीती आणि अस्वस्थता पाहायला मिळत आहे. फक्त शारीरिकत नव्हे, तर कोरोनामुळे अनेकांच्या मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असून, अनेकदा दुर्दैवाने काही टोकाचे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे सर्वलप्रथम स्वयंशिस्तीसोबतच किमान जनजागृती कोरोनावर मात करण्यास मदतीची ठरणार आहे हे ध्यानात घेणं अतीव महत्त्वाचं आहे.