जेएनयूचे विद्यार्थी गंभीर जखमी, लाठीचार्ज झालाच नसल्याचा पोलिसांचा दावा

 बॅरिगेट्स पार करत संसदेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. पण पोलीस आणि सीआरपीएफने त्यांना रोखले. 

Updated: Nov 19, 2019, 10:24 AM IST
जेएनयूचे विद्यार्थी गंभीर  जखमी, लाठीचार्ज झालाच नसल्याचा पोलिसांचा दावा  title=

नवी दिल्ली : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले. वाढवलेली हॉस्टेल फी आणि इतर भत्ते मिळावे या मागण्यांसाठी हे आंदोलन होते. संसदेपर्यंत मोर्चा काढल्यानंतर आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांचा सामना पोलिसांशी झाला. बॅरिगेट्स पार करत संसदेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. पण पोलीस आणि सीआरपीएफने त्यांना रोखले. 

यावेळी पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. तसेच अनेकांना यामध्ये मारहाण झाली. यावर दिल्ली पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या दरम्यान ३० जवान जखमी झाले तर केवळ १५ विद्यार्थीच जखमी झाल्याचा अजब दावा दिल्ली पोलिसांनी केला. पण पोलिसांनी विद्यार्थ्यांवर जोरदार लाठीचार्ज केल्याचे फोटो समाज माध्यमांतून समोर आले.

पोलिसांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना देखील निशाणा बनवल्याचे जेएनयूचे माजी विद्यार्थी अध्यक्ष बालाजी यांनी सांगितले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मोर्चामध्ये गाणे गाण्याचे जो काम करतो त्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. त्याच्या छातीवर पोलिसांच्या बुटांचे निशाण आहेत. जखमी झाल्यानंतर त्याला एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती बालाजी यांनी पत्रकारांना दिली. 

फी वाढीविरोधात जेएनयूमध्ये गेले दोन आठवडे आंदोलन सुरू आहे. सरकारने काही प्रमाण फी वाढ मागे घेतली आहे. पण पूर्ण फीवाढ मागे घेण्याची या विद्यार्थ्यांची मागणी आहे. 

कालपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत झाल्याने विद्यार्थ्यांनी संसदेबाहेरच जोरदार निदर्शने केली. या मोर्चासाठी दिल्ली पोलिसांनी मोठा कडक बंदोबस्त ठेवला होता. जवळपास बाराशे पोलीस या आंदोलनासाठी तैनात होते. या विद्यार्थ्यांना जेएनयूबाहेरच पडू न देण्यासाठी गेटवरच दोनशे पोलीस तैनात करण्यात आले होते.