दिल्लीश्वरांचे गुलाम होऊ नका; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा एल्गार

राव यांच्या या विधानाचा रोख भाजप व काँग्रेसच्या दिशेने होता.

Updated: Sep 2, 2018, 10:30 PM IST
दिल्लीश्वरांचे गुलाम होऊ नका;  तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा एल्गार title=

नवी दिल्ली: दिल्लीश्वरांचे गुलाम होऊन त्यांच्यापुढे झुकू नका, असे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कार्यकर्त्यांना केले. ते रविवारी हैदराबाद येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना पूर्ण सामर्थ्याने लढण्याचे आवाहन केले. 

आपल्या राज्याच्या विकासाचे निर्णय आपण स्वत:च घ्यायचे का दिल्लीश्वरांचे गुलाम होऊन राहायचे, याचा निर्णय जनतेनेच घेतला पाहिजे. राव यांच्या या विधानाचा रोख भाजप व काँग्रेसच्या दिशेने होता. याबाबतीत तामिळनाडूचे अनुकरण करा. राज्याचा स्वाभिमान जपण्यासाठी त्यांच्याकडे समर्थ राजकीय पक्ष असल्याचे के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले. 

तेलगंणा राष्ट्र समितीने आज विराट शक्तीप्रदर्शन करत आपली राजकीय महत्त्वाकांक्षा जाहीर केली. तत्पूर्वी दिवसभर तेलंगणा सरकार बरखास्त होईल, अशी प्रचंड चर्चा होती. पण वेळ आल्यावर उत्तर देऊ, असे राव यांनी सभेत सांगितले. या सभेच्या आयोजनासाठी तब्बल तीनशे कोटी रुपये इतका खर्च झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.