पणजी : अखेर गोव्यामधला राजकीय पेच संपला असून डॉ. प्रमोद सावंत हे गोव्याचे मुख्यमंत्री असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यामध्ये जोरदार सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. थोड्याच वेळात नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. एकीकडे काँग्रेस पक्षाने राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केलाय. तर दुसरीकडं पर्रिकर यांचा राजकीय वारसदार कोण, याचा शोध भाजपाश्रेष्ठी घेत आहेत... सिदाद ए गोवा या हॉटेलमध्ये भाजपाच्या नेत्यांची बैठक झाली. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपा, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि अपक्ष आमदारांशी चर्चा करण्यात आली.
शिवाय गोव्यात दोन उपमुख्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ घातली जाऊ शकते, असं समजतंय. पुढचं सरकार भाजपाचंच असेल, असा दावा शाह यांनी केलाय. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई हे गोव्याचे उपमुख्यमंत्री असणार आहे. तसेच यावेळी पुढचे सरकार भाजपाचेच असेल, असा दावा शाह यांनी केला.