मुंबई : आतापर्यंत मतदान केंद्रावर जाऊन मतदान निवडणूक पत्र (Voter ID Card) दाखवून आपण मतदान केलंय. ज्यांच्याकडे वोटर आयडी कार्ड नसेल ते निवडणूक आयोगाची संमती असणारी इतर कागदपत्र दाखवून मतदान करतात. पण आता डिजीटल वोटर आयडी कार्डचा प्रस्ताव समोर आला असून निवडणूक आयोग यावर विचार करतंय. पुढच्या वर्षी पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पॉंडेचेरी निवडणुकीत याचा उपयोग केला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. निवडणूक आयोगाचा यावर विचार सुरु आहे.
यासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या व्यक्तीला अर्जासोबत मोबाईल नंबर, ईमेल आयडी द्यावा लागेल. मतदार यादीत नाव आल्यावर एसएमएस आणि ईमेलच्या माध्यमातून याची माहिती दिली जाईल. एक ओटीपी आल्यानंतर तुम्ही मतदान ओळख पत्र डाऊनलोड करुन आपला मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये सेव्ह करु शकता.
डिजीटल वोटर आयडी हे आपल्या वोटर आयडीपेक्षा वेगळे असणार आहे. हे पीडीएफ फॉर्मेटमध्ये देखील असू शकते किंवा यामध्ये क्यूआर कोड देखील असू शकतो. हे वोटर आयडी मोबाईलवरुन डाऊनलोड होईल अशा प्रकारचेही असू शकते. यामध्ये फोटो स्पष्ट दिसणारा असू शकतो ज्यामुळे ओळखपत्र पडताळणी सोपी होईल.
निवडणूक आयोगाने या प्रस्तावास मंजुरी दिली तर मतदार आणि निवडणूक आयोग दोघांना फायदा होऊ शकतो. वोटर आयडी चोरी होणं, जळणं, फाटलं जाणं, ओलं होणं याची भीती राहणार नाही. हे आयडी मोबाईलमध्ये कायमचं राहील. तसंच मतदानाच्या दिवशी वोटर स्लीप दाखवण्याची गरज देखील भासणार नाही. तसेच मतदान ओळखत्र छपाईचा आयोगाचा खर्च देखील वाचू शकतो.