फोन उचलण्याच्या नादात बगलेत पकडलेल्या रॉड हिटरचं बटण दाबलं; जागेवरच मृत्यू

Electrocution By Rod Water Heater: पाळीव कुत्र्याला गरम पाण्याने अंघोळ घालण्यासाठी तयारी करत असतानाच त्याला अचानक फोन आला आणि फोन उचलण्याच्या नादात हा अपघात झाला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 13, 2024, 07:43 AM IST
फोन उचलण्याच्या नादात बगलेत पकडलेल्या रॉड हिटरचं बटण दाबलं; जागेवरच मृत्यू title=
रुग्णालयात दाखल केलं पण त्याला मृत घोषित करण्यात आलं

Electrocution By Rod Water Heater: तेलंगणमधील एका व्यक्तीचा अगदीच विचित्र अपघातामध्ये विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. रविवारी म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेत सदर व्यक्तीचा पाणी गरम करण्याच्या छोट्या पोर्टेबल रॉड हिटरमुळे मृत्यू झाला आहे. फोन कॉल उचलण्याच्या नादात या व्यक्तीने हात मोकळा व्हावा या हेतून हा हिटर आपल्या बगलेमध्ये टाकला. सामन्यपणे आपण एखादी काठी किंवा छत्री बगलेमध्ये पकडतो इतक्या सहजपणे त्याने हा रॉड बगलेत टाकला. मात्र या रॉडला वीज पुरवठा होत असल्याने शॉक लागून या व्यक्तीचा मृत्यू झाला.

कुठे घडला हा प्रकार

तेलंगणमधील खामना जिल्ह्यातील कालवोडू येथे हनुमान मंदिराजवळ राहणाऱ्या महेश नावाच्या व्यक्तीबरोबर हा प्रकार घडला आहे. महेशचा असा विचित्र पद्धतीने मृत्यू झाल्याची पंचक्रोशीत चर्चा आहे. आपल्या पाळीव कुत्र्याला गरम पाण्याचे अंघोळ घालण्यासाठी महेश तयारी करत होता. त्यावेळेस हा अपघात घडला.

नेमकं घडलं काय?

पाणी तापवण्याची तयारी करत असताना महेशला एक कॉल आला. हातातील पाणी तापवण्याचा इलेक्ट्रीक रॉड पाण्याच्या टबात टाकण्याऐवजी त्याने चुकून बगलेत टाकला. फोनवर बोलत असल्याने आपण बगलेत हा इलेक्ट्रीक रॉड पकडला असल्याचं त्याच्या लक्षात आलं नाही. अशातच त्याने या रॉडला वीज पुरवठा करणारं बटण दाबलं. विजेचा झटका बसल्याने महेश जागेवरच कोसळला. उपचार मिळण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. महेशच्या पत्नीने रुग्णवाहिका बोलावून त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. विजेचा झटका लागल्याने महेशचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

विजेच्या कुंपणाला स्पर्श केल्याने मृत्यू

30 जुलै रोजी घडलेल्या अशाच एका प्रकारामध्ये 17 वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. त्याने चुकून विजेचा प्रवाह असलेल्या तारेला हात लावल्याने त्याचा मृत्यू झाला. अदिलाबादमधील गुरुजा नावाच्या गावामध्ये ही दुर्घटना घडली.

वडिलांचा मोबाईल चार्जिंगला लावताना गमावेल प्राण

अन्य एका दुर्घटनेमध्ये एका 9 वर्षीय चिमुकीचाही अशाच पद्धतीने दुर्देवी मृत्यू झाला. खम्मम जिल्ह्यामध्ये 27 जुलै रोजी झालेल्या या अपघातादरम्यान ही चिमुकली वडिलांचा मोबाईल चार्जिंगला लावायला गेली असता तिचा मृत्यू झाला. मरण पावलेल्या मुलीचं नाव कंतीकला असं असून ती चौथ्या इयत्तेमध्ये शिकत होती. बाथरुममधून परत आल्यानंतर ही चिमुकली तिच्या वडिलांचा मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी गेली असता तिला विजेचा झटका बसला.