'मनमोहन यांना भारतरत्न देण्याची प्रणब मुखर्जींची इच्छा होती मात्र सोनिया..'; मोठा खुलासा

Manmohan Singh Bharat Ratna Award: 2014 मध्ये सचिन तेंडुलकर आणि सी. एन. राव यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मात्र त्या आधीच्या घटनाक्रमाबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 8, 2023, 08:06 AM IST
'मनमोहन यांना भारतरत्न देण्याची प्रणब मुखर्जींची इच्छा होती मात्र सोनिया..'; मोठा खुलासा title=
एका पुस्तकामध्ये यासंदर्भात करण्यात आला खुलासा (फोटो सौजन्य - एपी)

Manmohan Singh Bharat Ratna Award : माजी दिवंगत राष्ट्रपती आणि आयुष्यभर काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या प्रणब मुखर्जींना मनमोहन सिंग यांना 'भारतरत्न' पुरस्कार द्यायचा होता. प्रणव मुखर्जींनी मंत्रीमंडळ सचिवांना सोनिया गांधींचा यासंदर्भात काय विचार आहे याची चाचपणी करण्याचे निर्देश दिले होते. प्रणब मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जींनी त्यांच्या आगामी ‘इन प्रणब, माई फादर: ए डॉटर रिमेम्बर्स’ या पुस्तकामध्ये हा दावा केला आहे. प्रणब मुखर्जी यांच्या खासगी डायरीमध्ये लिहिलेल्या गोष्टीं तसेच वडिलांबरोबर वेळोवेळी झालेल्या चर्चांच्या आधारे शर्मिष्ठा यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्याची इच्छा होती

शर्मिष्ठा यांनी प्रणब मुखर्जींबरोबर वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवर झालेल्या त्यांच्या चर्चा तसेच प्रणबदांच्या डायरीमधील नोंदींचा संदर्भ ‘प्रणब, माई फादर: ए डॉटर रिमेम्बर्स’ या पुस्तकात दिला आहे. 'रुपा प्रकाशन'ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकामध्ये शर्मिष्ठा यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल प्रणब मुखर्जींबरोबर चर्चा व्हायची तेव्हा ते, 'मनमोहन सिंग हे राजकारणातील खरे जंटलमॅन आहेत' असं म्हणायचे. 'मला बाबाच्या डायरीमधून असं दिसून आलं आहे की राष्ट्रपती असतानाच यूपीए सरकारच्या कार्यकाळामध्ये मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्याची त्यांची इच्छा होती," असा दावा शर्मिष्ठा यांनी या पुस्तकामध्ये केला आहे.

त्यांनी यासंदर्भात विचारणा केली पण...

मनमोहन सिंग हे जगप्रसिद्ध अर्शतज्ज्ञ आहेत. त्यांनी भारताला मुक्त अर्थव्यवस्थेकडे नेण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. प्रणब मुखर्जींच्या कन्या शर्मिष्ठा यांनी, मनमोहन सिंग यांना 'भारतरत्न' पुरस्कार दिला जावा असं बाबांना (प्रणब मुखर्जींना) वाटतं होतं, असा दावा केला आहे. याचसंदर्भात राष्ट्रपती असताना 2013 साली प्रणब मुखर्जींनी मंत्रीमंडळ सचिवांशी चर्चा केली होती असा उल्लेखही या पुस्तकात आहे. पुलक चॅटर्जींशी बोलून सोनिया गांधींचा यावर काय विचार आहे जाणून घ्या, असे निर्देश प्रणब मुखर्जींनी दिले होते, असा शर्मिष्ठा यांचा दावा आहे. "मात्र यानंतर काय झालं याची मला काहीही कल्पना नाही. यासंदर्भात त्यांच्या डायरीमध्येही नोंद नाही," असं शर्मिष्ठा यांनी पुस्तकात म्हटलं आहे.

पुढल्याच वर्षी सचिनला मिळाला भारतरत्न

पुढल्याच वर्षी म्हणजे 2014 मध्ये सचिन तेंडुलकर आणि सी. एन. राव यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचा उल्लेखही शर्मिष्ठा यांनी केला आहे. "मनमोहन सिंग यांच्या नावाबद्दलच्या चौकशीवर काही उत्तर आलं होतं की नाही हे मला सांगता येणार नाही. कारण यासंदर्भातील उल्लेख बाबांच्या डायरीमध्ये नाही," असं शर्मिष्ठा म्हणाल्या आहेत.