स्वातंत्र्यदिनाच्या सुरक्षेसाठी देशातील पहिलं महिला स्वॅट पथक

यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची जबाबदारी पहिल्या महिला कमांडोज् यांच्याकडे.

Updated: Aug 12, 2018, 10:04 AM IST
स्वातंत्र्यदिनाच्या सुरक्षेसाठी देशातील पहिलं महिला स्वॅट पथक title=

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या सुरक्षेसाठी देशातील पहिलं महिला स्वॅट पथक तैनात असणार आहे. कठोर प्रशिक्षण घेतल्यानंतर देशाचं रक्षण करण्यासाठी स्वॅट पथक सज्ज झालं आहे. स्वॅट पथकातील तब्बल १२ महिला अधिकारी आसाम राज्यातील आहेत. तर अरूणाचल आणि सिक्कीम राज्यातून प्रत्येकी पाच महिला कमांडोंचा समावेश आहे. नागालँडच्या २ तर मिझोरम, त्रिपुराची प्रत्येकी एक महिला कमांडो या पथकात आहे. 

स्वातंत्र्यदिन सोहळ्याची जबाबदारी 

स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या सुरक्षेची जबाबदारी या टीमच्या खांद्यावर असणार आहे. या महिला अधिकाऱ्यांना मध्य आणि दक्षिण दिल्ली येथे मोक्याच्या ठिकाणी तैनात केलं जाणार आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांची ही महिला 'स्वॅट' टीम बनवण्याची कल्पना होती. दहशतवादी हल्ल्यासारख्या संकटाच्या काळात शत्रूंशी लढण्याचं प्रशिक्षण या टीमला देण्यात आलं आहे.

विशेष प्रशिक्षण

स्वॅट कमांडो यांना 'एमपी ५ सबमशिन गन' आणि 'जी-लॉक पिस्तुल' या शस्त्रांचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. शस्त्र नसताना देखील शत्रूचा सामना कसा करायचा हे देखील या महिला कमांडोंना शिकवण्यात आलं आहे. बस, हॉटेल, रेल्वे यामध्ये अडकलेल्या नागरिकांचा कसं वाचवायचं याचं प्रशिक्षण देखील यांना देण्यात आलं आहे.