नवी दिल्ली : घरबसल्या... काहीही काम न करता तुमच्या खात्यात सरकारकडून नऊ हजार रुपये जमा होतील, असं सध्या तुम्हाला कोणी सांगितलं तर कदाचित ते खरं वाटणार नाही... परंतु, लवकरच हे प्रत्यक्षात येण्याची चिन्हं आहेत.
केंद्र सरकार अशाच एका योजनेच्या विचारात आहे. या योजनेमुळे प्रत्येक वर्षी जवळपास १८ करोड लोकांच्या खात्यात जवळपास ९ हजार रुपये जमा होतील. हा पैसा तुम्हाला 'फूड सबसिडी'च्या रुपात मिळू शकेल. उल्लेखनीय म्हणजे, यासाठी ट्रायलही सुरू करण्यात आलीय.
सध्याही नागरिकांना सरकारकडून खाण्यावर सबसिडी मिळतेय. आपल्या देशातील जवळपास ५ लाख २७ हजार सरकारी रेशन दुकानांवर एक रुपया ते तीन रुपये प्रति किलो गहू किंवा तांदूळ मिळतात. हे धान्य सरकार २५-३० रुपयांना विकत घेतं. त्यामुळे प्रति किलो सरकारला २०-२५ रुपयांपर्यंत तोटा होतो. परंतु, या योजनेत अनेक त्रुटी आहेत ज्यामुळे याचा फायदा सामान्यांपर्यंत अनेकदा पोहचतही नाही.
नव्या योजनेंतर्गत बीपीएल आणि एपीएल कुटुंबांना प्रत्येक महिन्याला सबसिडीचं रेशन देण्याऐवजी सबसिडीची रक्कम सरळ नागरिकांच्या खात्यात जमा केली जाईल.
तसंच यासाठी देशातील ५ लाख २७ हजार रेशन डेपोंपैकी २ लाख २० हजार डेपोंना इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेलनं जोडण्यात आलंय. झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमध्ये या नव्या योजनेचा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात येतोय.