नवी दिल्ली : अच्छे दिन तर दूरची गोष्ट. पण, सध्या सुरू असलेले 'बुरे दिन' तरी कधी संपणार, असा सवाल विचारत माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात अर्थमंत्री राहिलेल्या यशवंत सिन्हा यांनी विद्यमान भाजप सरकारवर नुकतीच टीका केली. या टीकेनेंतर माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारला चांगलेच धारेवर धरले.
नोटबंदी नंतर देशातील लाखो लोकांचा रोजगार हिरावला गेला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांसाठी निर्माण होणारा रोजगार गेला. मी देशभर फिरतो तेव्हा, लोक मला विचारतात की, अच्छे दिन तर आलेच नाहीत. पण, सध्या सुरू असलेले बुरे दिन तर कधी संपणार? विद्यमान सरकारच्या आर्थिक धोरणाबाबत कॉंग्रेस नेहमीच सावधानतेचा इशारा देत आली आहे, असेही चिदंबरम यांनी म्हटले.
दरम्यान, कॉंग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लीकार्जून खर्गे यांनीही सरकारवर निशाणा साधला असून, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी नोटबंदीनंतर आगोदरच इशारा दिला होता की, या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेत २ टक्क्यांची घसरण होईल, असे म्हटले आहे.