जगदलपुर : 'गोल गोल रानी, इत्ता इत्ता पानी...' सारखी बालगीत आपण साऱ्यांनीच बालपणी गायली आहे. या गाण्याशी प्रत्येकाच्या बालपणीच्या आठवणी आहेत. मात्र रविवारी एका चिमुकल्याच्या तोंडून हे गाणं ऐकलं....आणि प्रत्येकालाच अश्रू अनावर झाले. ही हृदयस्पर्शी घटना आहे छत्तीसगडमधील.
छत्तीसगडच्या सशस्त्र दलातील जवान उपेंद्र साहू नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाले. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्यावेळी वडिलांना पाहून मुलाने 'गोल गोल रानी..' हे गाणं गायलं. मुलाच्या नकळत्या वयात त्याच्यावरून बापाचं क्षत्र हिरावलं या दुःखाने तेथील उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला.
बस्तरमध्ये शनिवारी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात छत्तीसगडच्या सशस्त्र दलातील दोन जवान शहीद झाले. यामधील उपेंद्र साहू यांच्यावर रविवारी अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचा चार वर्षाचा मुलगा देखील होता.
शहीद जवानाच्या पार्थिवाला खांदा देत जवान इंद्रावतीच्या नव्या पुलावरून नदी काठावर आले. यानंतर शहीद जवानाच्या पार्थिवावर पुष्पचक्र ठेवण्यात आले. शहिदाला पुन्हा एकदा गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या नातेवाईकांना पाहून आनंदाने 'गोल गोल रानी, इत्ता इत्ता पानी...' हे गाणं गाऊ लागला. चिमुकल्याचं हे गाणं ऐकून उपस्थितांना अश्रू अनावर झाले.
या घटनेने त्यावेळी सगळ्यांनाच स्तब्ध केलं. नकळत्या वयात या चिमुकल्यावर ही वेळ आली पण त्याला जेव्हा कळेल की, आपले वडिल या जगात नाहीत तेव्हा त्याच्यावर काय परिणाम होतील. याचा विचार करून प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत आहेत.