Gold Mines Found In India: जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचे (Lithium) मोठे साठे मिळाल्यानंतर भारताच्या हाती आणखीन एक मौल्यवान साठा लागला आहे. ओडिशामधील 3 जिल्ह्यांमध्ये जमीनीखाली मोठ्या प्रमाणात सोन्याचे साठे (Gold Mines) असल्याचे संकेत मिळाले आहेत. भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण आणि ओडिशा सरकारच्या भूविज्ञान निर्देशालयाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये देवगड, क्योंइर आणि मयूरभंज जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे असल्याचे संकेत मिळाले आहेत.
ओडिशामधील ज्या तीन जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे मिळाल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत त्यामध्ये क्योझर जिल्ह्यांमधील दिमिरिमुंडा, कुशकला, गोटीपूर, गोरपूर तर मयूरभंज जिल्ह्यातील जोशीपूर, सुरियागुडा, रुआंसिला, धुशूरामध्ये त्याचप्रमाणे देवगडमधील अदास या भागांचा समावेश आहे. या भागांमध्ये सर्वात आधी सर्वेक्षण 1970 आणि 80 च्या दशकांमध्ये करण्यात आलं होतं. खाणी आणि भूविज्ञान निर्देशालय आणि जीएसआयने हे सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणामध्ये मिळालेली माहिती सार्वजनिक करण्यात आली नव्हती.
राज्याचे खाण मंत्री प्रफुल्ल कुमार मलिक यांनी, जीएसआयने मागील 2 वर्षांमध्ये या 3 जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा नव्याने सर्वेक्षण केलं होतं. ढेंकनालचे आमदार सुधीर कुमार सामल यांनी सोन्याच्या साठ्यांसंदर्भातील प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना प्रफुल्ल कुमार यांनी 3 जिल्ह्यांमध्ये 'खजाना' मिळण्याची शक्यता असल्याचं सांगितलं होतं. मात्र या तिन्ही जिल्ह्यांमध्ये सापडलेल्या संभाव्य सोन्याच्या साठ्यांमध्ये नेमकं किती सोनं असू शकतं याबद्दलचा खुलासा करण्यात आलेला नाही.
यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये लिथियमचे साठे सापडले आहेत. हे साठे 59 टनांचे आहेत. चिली आणि ऑस्ट्रेलियानंतर हे जगातील सर्वात मोठे लिथियम साठे असल्याचं सांगितलं जात आहे. या साठ्यांमध्ये लिथियम निर्मितीमध्ये भारताने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. लिथियम हा असा नॉन फेरस धातू आहे ज्याचा वापर मोबाइल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक व्हेइकलबरोबरच अनेक उपकरणांमध्ये केला जातो ज्यामध्ये रिचार्जेबल बॅटरी वापरली जाते. आतापर्यंत यासाठी भारत इतर देशांवर अवलंबून होता.
जगातील लिथियम साठ्यांबद्दल बोलायचं झाल्यास याबाबतीत चिली 93 लाख टनांसहीत पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया 63 टन उत्पादनासहीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. काश्मीरमध्ये 59 लाख टन साठे सापडल्याने भारत या यादीत तिसऱ्या स्थानी आला आहे. अर्जेंटिना 27 लाख टन उत्पादनासहीत चौथ्या तर चीन 20 लाख टनांसहीत पाचव्या क्रमांकावर आहे. 10 लाख टनांच्या साठ्यासहीत चीन सहाव्या स्थानी आहे.