मुंबई : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन इथं सर्वोच्च नागरी पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यात एक होते कर्नाटकमधल्या मंगळुरु इथले संत्र विक्रेते हरेकाला हजब्बा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी राजधानी नवी दिल्लीत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला. ग्रामीण शिक्षणातील योगदानाबद्दल हजब्बा यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
शाळेची स्थापना करुन ग्रामीण शिक्षणात क्रांती घडवणाऱ्या 66 वर्षीय हजब्बा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मंगळुरूच्या हरेकला-न्यूपडपू गावात त्यांनी शाळा बांधली होती. सध्या या शाळेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी साधनसंपत्ती असलेल्या गावातील तब्बल 175 मुलं शिक्षण घेत आहेत.
1977 पासून मंगळुरु बस डेपोमध्ये संत्री विकणारे हजब्बा हे स्वत: अशिक्षित आहेत, परिस्थितीमुळे त्यांनी कधी शाळेची पायरी चढली नाही. पण एका घटनेनं त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. 1978 मध्ये एक परदेशी व्यक्ती त्यांच्याकडे संत्र विकत घेण्यासाठी आला. त्याने इंग्रजीत हजब्बा यांना संत्र्याची किंमत विचारली. ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली. यानंतर त्यांनी ग्रामीण शिक्षणात क्रांती घडवून आणण्याचा निर्णय घेतला.
हरेकाला हजब्बा म्हणतात जेव्हा परदेशी व्यक्तीने इंग्रजीमध्ये संत्र्याची किंमत विचारली तेव्हा मला काहीही उत्तर देता आलं नाही. मला इंग्रजी कळत नव्हतं. या गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं. पण गावातील येणारी पिढी अशिक्षित राहू नये हा विचार माझ्या डोक्यात आला आणि तेव्हाच गावात एक शाळा उभारण्याचा निर्णय घेतला.
हजब्बा यांना केवळ कन्नड भाषा येते, इंग्रजीच काय त्यांना हिंदी भाषाही कळत नव्हती. भाषेच्या अडचणीमुळे परदेशी व्यक्तीची मदत करता न आल्याची खंत त्यांना वाटत होती. या घटनेनंतर त्यांनी गावात शाळा बांधण्याचा निश्चय मनाशी पक्का केला. आपलं शाळेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना तब्बल दोन दशकं लागली.
ग्रामीण शिक्षणातील योगदानाबद्दल हजब्बा यांना 'अक्षर संत' ही उपाधी देण्याती आली. शाळा बांधण्यासाठी हजब्बा यांनी तेव्हाचे आमदार यू टी फरीद यांची भेट घेतली. फरीद यांनी 2000 साली शाळा बांधण्याची अनुमती दिली. शाळा सुरु झाल्यानंतर सुरुवातीला केवळ 26 विद्यार्थी होते. पण आता इथे दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे, आणि तब्बल 175 मुलं या शाळेत शिक्षण घेतायत.
हजब्बा यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. पुरस्कारातून मिळालेल्या पैशांचा ते गावातील सुविधा आणि शाळेसाठी उपयोग करतात. हरेकाला हजब्बा यांचं पुढचं लक्ष्य गावात महाविद्यालय सुरु करण्याचं आहे. आणि यासाठी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंतीही केली आहे.