Himachal Pradesh Government Adani Group Cement Crisis: हिमाचल प्रदेश सरकार (Himachal Pradesh Government) समोर सीमेंट (Cement Crisis) उद्योगासंदर्भातील मोठा प्रश्न निर्माण आहे. सध्या राज्यामधील दोन महत्त्वाचे सीमेंट कारखाने बंद झाल्याने आणि ट्रक ड्रायव्हर्सने अनिश्चित कालावधीसाठी आंदोलन सुरु केल्याने सीमेंट उद्योग अडचणीत आला आहे. दोन सीमेंट कारखाने बंद झाल्याने हिमाचल सरकारसमोर सीमेंट संकट निर्माण झालं आहे. आता हिमाचल प्रदेश सरकारने या सीमेंट संकटावर मात करण्यासाठी वेगाने निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या राज्याचे उद्योगमंत्री या मुद्द्यावरुन सीमेंट कंपनीची मालकी असलेल्या अदानी ग्रुपबरोबर (Adani Group) चर्चा करत आहेत. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी ही माहिती दिली आहे.
आपला मतदारसंघ असलेल्या हमीरपूर जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी एनआयटी हेलीपॅडजवळ प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अदानी ग्रुपच्या मालकीचे बिलासपूर आणि सोलन येथील दोन्ही सीमेंट कारखान्याशी संबंधित ट्रक संचालक संघटनांनी नवीन दरांचा प्रस्ताव कारखान्यांकडे पाठवला आहे. संबंधित विभागाच्या सरकारी अधिकाऱ्यांना सरकारने कारखान्यांचा प्रशासकीय कारभार पाहणाऱ्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन चर्चा करण्याचे निर्देश दिले आहेत. बरमाणामध्ये (बिलासपूर) एसीसी आणि दारलाघाटमध्ये (सोलन) अंबुजा सीमेंटचा कारखाना मालाची ने-आण करण्यासंदर्भातील वादावरुन बंद पडला आहे. 14 डिसेंबरपासून हा वाद सुरु असून सध्या या दोन्ही कारखान्यांमध्ये माल पडून असला तरी ट्रक चालकांनी दरवाढीसाठी केलेल्या आंदोलनामुळे येथील मालाची ने-आण केली जात नाहीय.
अदानी ग्रुपने सीमेंट क्षेत्रामध्ये प्रवेश करताना अंबुजा आणि एसीसी या दोन मोठ्या सीमेंट निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांमध्ये हिस्सेदारी विकत घेतली. अदानी ग्रुप सीमेंट क्षेत्रामध्ये पाय रोवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचं मागील काही महिन्यांपासून दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून अदानी ग्रुपने फार जुन्या आणि विश्वासार्ह सीमेंट निर्मिती कंपन्या असलेल्या एसीसी आणि अंबुजा सीमेंटमधील हिस्सेदारी विकत घेतली.
मागील काही दिवसांपासून अदानी ग्रुप मागील गुरुवारी अमेरिकेतील (America) शॉर्ट सेलिंग फर्म असलेल्या हिंडनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) जारी केलेल्या अहवालामुळे चांगलाच चर्चेत आहे. मागील आठवड्याभरामध्ये अदानी समुहाला हजारो कोटी रुपयांचा तोटा या अहवालामुळे सहन करावा लागला आहे. असं असतानाच आता हिमाचलमधील या सीमेंट संकटामुळेही कंपनी चर्चेत आली आहे. या कारखान्यांमधील उत्पादन अशाच पद्धतीने बंद राहिल्यास सीमेंटचे दर वाढवण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. सीमेंटची टंचाई निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या दोन्ही कंपन्या आणि हिमाचल प्रदेश हे सीमेंट निर्मितीचं देशातील महत्त्वाचं केंद्र आहे.