Teacher's Day 2022 : शिक्षक दिनाचा इतिहास तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या...

प्रत्येक विद्यार्थीं हा शिक्षकांच्या आशीर्वादाने अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करतो

Updated: Sep 4, 2022, 11:54 PM IST
Teacher's Day 2022 : शिक्षक दिनाचा इतिहास तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या... title=

पोपट पिटेकर, झी मिडीया, मुंबई : प्रत्येक विद्यार्थीं हा शिक्षकांच्या आशीर्वादाने अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करतो. म्हणूनच आपल्या जीवनात गुरूचे खूप महत्त्व आहे. गुरूशिवाय ज्ञान मिळणे अशक्य आहे. त्यामुळेच जीवनात शिक्षकांना विशेष महत्त्व आहे. भारतातच नाही तर जगातही शिक्षकांकडे आदाराने पाहिलं जातं. म्हणूनच शिक्षकांना विषेश आदर देण्यासाठी शिक्षक दिन (Teacher's Day) साजरा केला जातो. 

भारतात दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. यादिवशी देशात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं जातं. 5 सप्टेंबर या दिवशी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला. ते स्वतः एक महान शिक्षक होते. त्यांचे व्यक्तिमत्व उत्कृष्ट होते. त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करावा, ही त्यांचीच कल्पना होती. "माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी हा दिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला तर माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल," असे त्यांनी म्हटलं होतं. ही त्याचीच कल्पना असल्यानं आपण सर्वजण 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करतो. 

शिक्षक दिनाचा इतिहास

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारतीय संस्कृतीचे विद्वान मुत्सद्दी, भारताचे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती आणि सर्वोकृष्ट शिक्षक म्हणून ओळखले जातात.  जिथून काही शिकण्यासारखे आहे, ते जीवनात घेतले पाहिजे, असे ते म्हणत असत. शिकवण्यापेक्षा मुलांच्या बौद्धिक विकासावर अधिक भर देण्याबाबत ते बोलत असत. 1954 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

शिक्षक दिनाची तयारी

शिक्षक दिन म्हटल्यावर शाळेत विविध कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं जात. यादिवशी विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही सांस्कृतिक कार्यक्रमात आनंदात सहभागी होतात.

शाळा, महाविद्यालयांसह विविध संस्थांमध्ये शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन नेहमी करतात. याच दिवशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंतीही साजरी केली जाते.

शिक्षकांचा सन्मान

शिक्षक दिन सर्व शिक्षक आणि गुरूंना समर्पित आहे. या दिवशी शिक्षकांचा सन्मान केला जातो. भारतातील शिक्षक दिन हा शिक्षकांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रसंग आहे. जीवनातील संकटांना तोंड द्यायला शिक्षक शिकवतात. त्यामुळेच देशभरात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्राचीन काळापासून, विद्यार्थ्याच्या जीवनात गुरुंचा मोठा वाटा आहे. गुरुंच्या ज्ञानाने आणि मार्गदर्शनानेच आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. त्यामुळे या दिवसाला अनन्य असं महत्त्व आहे.