Right on the Property of In-Laws : आपल्या देशात कायद्याविषयी अद्यापही अनेकांमध्ये गैरसमज असल्याचे दिसून येते. याच गैरसमजातून अनेक चुकीचे निर्णय देखील घेतले जातात. त्यामुळे अनेक चुकीच्या गोष्टी लोकांसमोर येतात. यामध्ये पत्नीला तिच्या पतीच्या मालमत्तेत (Right Of Wife On Husband Property) किंवा पतीच्या पालकांच्या मालमत्तेवर हक्क असतो का किंवा तो किती असतो याबाबतही अनेकांना आवश्यक ती माहिती नसते. त्यामुळे काहीवेळा अडचणी निर्माण होतात. मात्र भारतात याबाबत कायद्यात स्पष्ट तरतुदी करण्यात आल्या आहेत.
पती-पत्नीचे नाते हे संपत्ती किंवा इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा नेहमीच वरचे असते. मुलीचं लग्न झालं की नवऱ्याचं घर हेच तिचं घर असतं असं कायमच सांगितले जाते. पण प्रत्यक्षात पत्नीचा त्याच्या पतीच्या संपत्तीवर किती अधिकार असतो याबाबत जाणून घेऊया. पण मालमत्तेच्या अधिकाराच्या बाबतीत, भारतीय उत्तराधिकार कायदा, हिंदू उत्तराधिकार कायदा, मुस्लिम वैयक्तिक कायद्यामध्ये संपत्तीच्या अधिकाराचे नियम लागू आहेत.
पतीच्या मालकीच्या संपूर्ण मालमत्तेवर पत्नीचा पूर्णतः अधिकार असतोच असे नाही. पत्नीला तिच्या सासरच्या संपत्तीवर तितकाच अधिकार असतो जितका अधिकार तिच्या सासरच्या मंडळींना द्यायचा असतो. तितकाच अधिकार हा पतीच्या संपत्तीवरही असतो. कोणत्याही व्यक्तीची त्याने स्वतः मिळवलेली मालमत्ता आणि त्याला वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता, असे दोन प्रकार असतात.
यातील पतीने स्वतः मिळवलेल्या मालमत्तेवर त्याचाच अधिकार असतो. यावरुन ती संपत्ती पत्नीला मिळणार की नाही याबाबतचा निर्णय त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. त्या संपत्तीबाबत कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार हा तिने मिळवलेल्या व्यक्तीलाच असतो. ती व्यक्ती मालमत्ता विकू शकते, दान करु शकते किंवा त्याच्या मृत्यूपत्रातही जोडू शकते.
त्यामुळे भारतीय वारसाहक्क अधिनियमानुसार, त्या व्यक्तीच्या संपत्तीवर तेव्हाच हक्क असू शकतो, जेव्हा त्याचे नाव मृत्यूपत्रात मृत्यूआधीच मालमत्ता असलेल्या व्यक्तीनं लिहून ठेवलेलं असेल. त्यामुळे पती जिवंत असेपर्यंत त्याने मिळवलेल्या संपत्तीवर पत्नीला कोणताही अधिकार नसतो. जर पतीने मृत्यूपत्रात त्याच्या संपत्तीचा अधिकार पत्नीव्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीचा उल्लेख केला असेल तर पत्नीला मालमत्तेत कोणताही अधिकार नसेल.
असा मिळू शकतो पतीच्या संपत्तीवर अधिकार
जर पतीचा मृत्यूपत्राशिवाय मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत त्याच्या संपत्तीवर पत्नी, आई आणि त्याच्या मुलांचा अधिकार असतो. हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 च्या नियमानुसार ही संपत्ती कुटुंबियांना मिळू शकते. दरम्यान, पती जिवंत असताना पत्नीला त्याच्या संपत्तीवर कोणताही अधिकार नाही. जर ते विभक्त झाल्यास पत्नी केवळ पोटगीचा दावा करू शकते. याव्यतिरिक्त मृत्यूपत्रात उल्लेख नसेल तर ती तिच्या पतीच्या मालमत्तेवर कोणताही दावा करू शकत नाही.