हैदराबाद एन्काऊंटरवर पीडित तरूणीच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया

आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभेल 

Updated: Dec 6, 2019, 03:03 PM IST
हैदराबाद एन्काऊंटरवर पीडित तरूणीच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया  title=

मुंबई : हैदराबाद हत्याकांड प्रकरणातील चारही आरोपींचं एन्काऊंटर झालं. यानंतर जगभरात उत्साह साजरा करण्यात आला. या एन्काऊंटरवर पीडित तरूणीच्या कुटुंबियांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पीडित तरूणीच्या वडिलांनी हैदराबाद पोलिसांचे आभार मानले आहेत. 

माझ्या मुलीच्या मृत्यूला 10 दिवस झाले. मी हैदराबाद पोलीस आणि सरकारचे खूप आभार मानतो. आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल अशी भावनिक प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली आहे. 

तसेच तरूणीच्या बहिणीने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आम्ही या एन्काऊंटरचं स्वागत करतो. आम्ही आज खूप खूष आहोत. आम्ही एन्काऊंटरचा विचारच केला नव्हता. आम्हाला वाटलं होतं की, कोर्टाकडून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली जाईल. आमच्यासोबत उभे राहिलेल्या प्रत्येकाचे आम्ही आभार मानतो. या एन्काऊंटरमुळे यापुढे महिलांविरोधात असं कृत्य करणाऱ्यांना जरब बसेल, अशी प्रतिक्रिया पीडित तरूणीच्या बहिणीने दिली आहे.

हैदराबाद बलात्कार प्रकरणातल्या चारही आरोपींचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे. घटनास्थळी नेत असताना चौघांचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे. या एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. घटनास्थळी नेल्यानंतर या आरोपींनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेलंगणा पोलिसांनी चौघांचं एन्काऊंटर केलं. तेलंगणा पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे.

हैदराबादमध्ये २७ नोव्हेंबरला महिला डॉक्टरसोबत सामूहिक बलात्कार करण्यात आला. यानंतर पीडित महिलेला जाळून मारण्यात आलं. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती, तसंच पीडित महिलेला लवकर न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरु लागली होती. २७ नोव्हेंबरला ४ आरोपींनी पहिले पीडित महिलेची गाडी पंक्चर केली आणि  मदत करण्याचं नाटक केलं. यानंतर चारही आरोपी तिला टोल प्लाझाजवळच्या निर्जन स्थळी घेऊन गेले. याठिकाणी महिलेवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली.