सियाचीनमध्ये पुन्हा एकदा हिमस्खलन, बर्फाच्या वादळात दोन जवानांचा मृत्यू

१९ नोव्हेंबर रोजी चार जवानांसहीत दोन स्थानिक नागरिकांचा हिमस्खलानात बळी गेला होता

Updated: Nov 30, 2019, 08:26 PM IST
सियाचीनमध्ये पुन्हा एकदा हिमस्खलन, बर्फाच्या वादळात दोन जवानांचा मृत्यू  title=

श्रीनगर : भारताच्या उत्तर भागातील सियाचीन ग्लेशियरमध्ये (Siachen Glacier) भारतीय सैन्यदलाची एक पेट्रोलिंग टीम बर्फाच्या वादळात अडकली. हिमस्खलनात  दोन जवानांचा मृत्यू झाल्याची बातमी हाती येतेय. सियाचीन हे जगातील सर्वात उंचावरचं युद्धक्षेत्र मानलं जातं. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा हे बर्फाचं वादळं आलं तेव्हा सैन्यदलाची एक तुकडी १८,००० फुटांवर पेट्रोलिंगसाठी निघाली होती. शनिवार पहाटे ३.३० वाजता ही घटना घडल्याचं समजतंय. 

या घटनेची माहिती समजताच रेस्क्यू आणि मदत टीम घटनास्थळाकडे रवाना झाली. या ऑपरेशनसाठी आर्मीच्या हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली. घटनास्थळी पोहचताना रेस्क्यू टीमला पेट्रोलिंग टीमपर्यंत पोहचण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. बर्फाच्या थराखाली अडकलेल्या जवानांना रेस्क्यू टीमनं बाहेर काढलं. परंतु, एव्हाना दोन जवानांचा मृत्यू झाला होता. 

इतर जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं आर्मीच्या बेस कॅम्पला हलवण्यात आलं. संरक्षण दलाच्या प्रवक्त्यांनी या घटनेला दुजोरा दिलाय. 

यापूर्वी १९ नोव्हेंबर रोजी चार जवानांसहीत दोन स्थानिक नागरिक पोर्टर्सचाही (civilian porters) हिमस्खलानात बळी गेला होता. यावेळीही, आर्मीच्या या टीममध्येही आठ जवानांचा समावेश होता. त्यातील चौघांना मृत्यूनं गाठलं.

तर जानेवारी महिन्यात लेह-लडाख भागातील खारदुंग-ला भागात बर्फाच्या वादळात पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.