मुंबई : रेल्वेने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता महिलांना ट्रेनमध्ये आरक्षित जागा मिळवण्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. ज्या प्रकारे बस आणि मेट्रो ट्रेनमध्ये महिलांसाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवल्या जातात, त्याचप्रमाणे आता भारतीय रेल्वेमध्येही महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वेने महिला प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये विशेष बर्थ बनवले आहेत.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये महिलांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी भारतीय रेल्वेने राखीव बर्थसह अनेक सुविधा सुरू केल्या आहेत.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये स्लीपर क्लासमध्ये सहा बर्थ आरक्षित केले जातील. गरीब रथ, राजधानी, दुरांतो या पूर्ण वातानुकूलित एक्सप्रेस गाड्यांच्या थर्ड एसी कोचमध्ये सहा बर्थ महिला प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात येतील.
प्रत्येक स्लीपर कोचमध्ये सहा ते सात लोअर बर्थ, वातानुकूलित ३ टायर एसी कोचमध्ये चार ते पाच लोअर बर्थ राखीव ठेवले जातील.
ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला वातानुकूलित 2 टायर एसी डब्यांमध्ये तीन ते चार लोअर बर्थ राखीव ठेवले जातील.
रेल्वेमंत्री म्हणाले, 'गाड्यांमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे संरक्षण दल (RPF) GRP आणि जिल्हा पोलिस प्रवाशांना उत्तम सुरक्षा प्रदान करतील.'
यासोबतच रेल्वे आणि स्थानकांवर महिला प्रवाशांसह इतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जीआरपीच्या मदतीने रेल्वेकडून पावले उचलली जात आहेत.
रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने गेल्या वर्षी संपूर्ण भारतातील 'मेरी सहेली' हा उपक्रम सुरू केला होता. ज्याचा उद्देश महिला प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान सुरक्षा प्रदान करण्याचा होता.