राम रहिम प्रकरणाच्या निकालाआधी इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमविरोधातील १५ वर्षांपूर्वीच्या बलात्कार प्रकरणी शुक्रवारी निकाल येणार आहे. राम रहीमबाबत येणारा निकाल पाहता हरियाणा सरकारने कलम १४४ लागू केले आहे. २५ ऑगस्टला राज्यातील शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २४ आणि २५ ऑगस्टला सरकारी सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.

Updated: Aug 24, 2017, 03:06 PM IST
राम रहिम प्रकरणाच्या निकालाआधी इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद title=

चंदीगड : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमविरोधातील १५ वर्षांपूर्वीच्या बलात्कार प्रकरणी शुक्रवारी निकाल येणार आहे. राम रहीमबाबत येणारा निकाल पाहता हरियाणा सरकारने कलम १४४ लागू केले आहे. २५ ऑगस्टला राज्यातील शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २४ आणि २५ ऑगस्टला सरकारी सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.

सुनावणीआधी राम रहीमचे समर्थक प्रशासनाला धमकी देत असून पंजाब आणि हरियाणा राज्यातील कायदा-सुव्यवस्था न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर बिघडण्याची शक्यता असल्याने ५० पॅरामिलिटरी फोर्सच्या जवानांची टीम तैनात करण्यात आली आहे.

सध्या दोन हजारांहून जास्त जवान पंचकुला जिल्ह्यात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्याला छावणीचे स्वरुप आले आहे. रस्त्यांवर बॅरिकेटिंग केली आहे. हरियाणाच्या २१ जिल्ह्यातील सुरक्षेत वाढ केली आहे. तर संपूर्ण राज्यात कलम १४४ लावण्यात आले आहे.

पंजाब आणि हरियाणा सरकारला बाबासंदर्भात येणारा निकाल पाहता हायअलर्ट देण्यात आला आहे. २५ ऑगस्टला निर्णय येणार असल्याने चंडीगडच्या सेक्टर १६ मधील क्रिकेट स्टेडियम तात्पुरत्या तुरुंगात बदलण्याची शक्यता आहे. राज्यातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे.