तुम्हाला कॅन्सर झालाय! Aditya-L1 च्या लॉन्चिंगच्या काही तास आधी ISRO प्रमुखांना कळलं, तरीही...

ISRO Chief S Somanath Cancer: इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनीच ही माहिती दिली. त्यांनी त्या दिवशी नेमकं काय घडलं यासंदर्भातील माहिती दिली. तसेच सध्या प्रकृती कशी आहे याबद्दलही त्यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 4, 2024, 03:25 PM IST
तुम्हाला कॅन्सर झालाय! Aditya-L1 च्या लॉन्चिंगच्या काही तास आधी ISRO प्रमुखांना कळलं, तरीही... title=
इस्रोच्या प्रमुखांनीच दिली ही माहिती

ISRO Chief S Somanath Cancer: भारताच्या सौर मोहीम आदित्य एल-1 च्या लॉन्चिंगच्या वेळेस भारतीय अंतराळ संघटनेचे (इस्रोचे) प्रमुख एस. सोमनाथ हे कॅन्सरशी झुंज देत होते अशी माहिती समोर आली आहे. सोमनाथ यांनी एका मुलाखतीमध्ये या वृत्ताला दुजोरा दिला आहे. स्कॅनिंगमध्ये मला कॅन्सर झाल्याचं समजलं होतं. चांद्रयान-3 मोहिमेच्या लॉन्चिंगदरम्यानही आरोग्यासंदर्भातील काही समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र त्यावेळेस आजारासंदर्भातील कोणतंही चित्र स्पष्ट झालेलं नव्हतं. आदित्य मोहिमेच्या दिवशीच त्यांना या आजारासंदर्भात महिती मिळाली होती. यामुळे सोमनाथ आणि त्यांचे कुटुंबीय चांगलेच चिंतेत होते.

सर्वचजण खचले

सोमनाथ यांचे सर्व सहकारी आणि वैज्ञानिकही ही बातमी ऐकून चिंताक्रांत झाले होते. मात्र या आव्हानात्मक परिस्थितीलाही सोमनाथ यांनी स्वत:ला सावरलं होतं. सोमनाथ यांनी स्वत:ला सावरण्याबरोबरच कुटुंबियांना तसेच इस्रोच्या वैज्ञानिकांनाही सावरलं. सूर्ययान लॉन्च झाल्यानंतर त्यांनी खरोखरच आपल्याला कॅन्सर झाला आहे का हे जाणून घेण्यासाठी पोट स्कॅन केलं. त्यावेळी त्यांना खरोखरच कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र अधिक तपास आणि इलाजासाठी ते चेन्नईला गेले. त्यावेळेस हा आजार त्यांच्या कुटुंबामध्ये अनुवांशिक असल्याचं स्पष्ट झालं होतं. सोमनाथ यांना पोटाच्या कॅन्सरचं निदान झालेलं. 

औषधोपचार सुरु

चाचण्यांनतर काही दिवसात कॅन्सर झाल्याचं स्पष्ट करणारे रिपोर्ट्स समोर आले. सोमनाथ यांच्या पोटावर त्यानंतर शस्रक्रीया करण्यात आली. त्यानंतर अनेक महिने त्यांच्यावर केमोथेरिपी सुरु होती. सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कालावधी संपूर्ण कुटुंब तणावाखाली होतं. मात्र आता सर्वकाही ठीक असल्याचं सोमनाथ म्हणाले. सोमनाथ यांच्यावरील शस्त्रक्रीया यशस्वी झाली आहे. ते यामधून रिकव्हर होत आहेत. सध्या त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत. मात्र या संपूर्ण कालावधीमध्ये त्यांना कुटुंबाने आणि सहकाऱ्यांनी मोठा आधार दिला.

मी जिंकणारच

सोमनाथ यांनी या आजाराच्या उपचारांना फार वेळ लागतो याची आपल्याला कल्पना असल्याचं म्हटलं. हा एक लांबचा पल्ला आहे. मात्र मी हे युद्ध जिंकणारच. आता मी बऱ्याच प्रमाणात रिकव्हरी केली आहे. मी केवळ चार दिवस रुग्णालयामध्ये दाखल होतो. त्यानंतर मी माझं काम पूर्ण केलं. कोणत्याही वेदनांशिवाय मी इस्रोच्या पाचव्या दिवसापासून काम सुरु केलं. मी नियमितपणे वैद्यकीय चाचण्या करत असून स्कॅनिंग करत आहे. मात्र आता मी पूर्णपणे बरा झालो आहे. सध्या माझं लक्ष कामावर आणि इस्रोच्या मोहिमा पूर्ण करण्याबरोबरच लॉन्चिंगवर आहे. मी इस्रोच्या संपूर्ण मोहिमा पूर्ण करेनच, असा विश्वास सोमनाथ यांनी व्यक्त केला. सोमनाथ यांचा हा निश्चय पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.