नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा बरखास्त केल्यानंतर राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोठा खुलासा केला आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यात विधानसभा बरखास्त करण्याच्या निर्णयाला योग्य ठरवलं आहे. जर या निर्णयासाठी मी दिल्लीकडे पाहिलं असतं तर त्यांना सज्जाद लोनचं सरकार बनवावं लागली असती. त्यामुळे त्यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. मला विश्वासघात करायचा नव्हता.
याआधी सत्यपाल मलिक यांनी म्हटलं होतं की, दोघांपैकी कोणाकडेच यादी नव्हती. महबूबा यांच्याकडे ही नाही आणि सज्जाद लोन यांच्याकडे ही नाही. सज्जाद लोन म्हणत होते मी त्यांना संपर्क केला. जेव्बा मी विचारलं की, कुठे संपर्क केला तर त्यांनी म्हटलं की, मी तुमच्या पीएला व्हॉट्सअॅप केला. मला हे माहित नव्हतं की, व्हॉट्सअॅप आणि ट्विटरव देखील सरकार बनते.
मलिक यांनी पुढे म्हटलं की, सरकार बनवण्याचा दावा व्हॉट्सअॅपवर नाही केला जात. पण जेव्हा मी त्या व्हॉट्सअॅपबाबत विचारपूस केली तेव्हा मला कळालं आधीच्या राज्यपालांच्या पीएला त्यांनी मॅसेज केला होता. मी 15 दिवसांपासून हे सगळं पाहत होतो आणि मला माहित होतं की, कोणाकडेच बहुमत नव्हतं. पण एकाला जरी बोलवलं असतं तर अनैतिकता वाढली असती. सरकार बनवण्यासाठी घोडेबाजार लागला असता. पैसा तर आलाच असता पण दहशतवादीपण सोबत आले असते. 8 ठिकाणी निवडणूक बाकी आहे.
सत्यपाल मलिक यांनी शनिवारी म्हटलं की, महबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला सरकार बनवण्यासाठी गंभीर असते तर कोणाच्याही हस्ते पत्र पाठवलं असतं किंवा फोन ही केला असता. माझा फोन नेहमी सुरु असतो. रात्री दोन वाजता देखील. मी तर व्हॉट्सअॅपवरुन आलेल्या समस्यांचे मॅसेज देखील सोडवण्यासाचा प्रयत्न करतो.'