'जेट एअरवेज'साठी खुशखबर, कर्मचारीच बनणार मालक

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' ही घोषणाच यातून पूर्णत्वास येतेय

Updated: Jun 29, 2019, 03:39 PM IST
'जेट एअरवेज'साठी खुशखबर, कर्मचारीच बनणार मालक

नवी दिल्ली : 'जेट एअरवेज'च्या ७५ टक्के समभागासाठी कर्मचाऱ्यांचा एक समूह आणि ब्रिटनच्या आदि ग्रुपनं मिळून बोली लावण्याची घोषणा शुक्रवारी केली. जेट एअरवेजला खरेदी करण्यासाठी हा एक प्रयत्न असेल. एनसीएलटीच्या प्रक्रियेचा सामना करणारी 'जेट एअरवेज' पहिलीच विमान कंपनी आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यातही अपयशी ठरलीय. एनसीएलटीमध्ये कंपनीविरुद्ध 'स्टेट बँक ऑफ इंडिया'नं २६ इतर कर्जदारांकडून २० जून रोजी दिवाळखोरीची याचिका दाखल करण्यात आली होती. जेट एअरवेजवर बँकांचं जवळपास ८५०० करोड रुपये तसंच वेंडर, पट्टा देणारे आणि कर्मचारी इत्यादी २५,००० करोड रुपये थकबाकी आहे. कर्मचाऱ्यांचा समूह आणि आदि ग्रुपनं एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून याची घोषणा केलीय. 

संयुक्तरित्या देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतीय विमान उद्योगाच्या इतिहासात हा एक नवीन प्रकाश असेल. एखाद्या विमान कंपनीचा प्रत्येक कर्मचारीच त्या कंपनीचा मालक असेल, हे इतिहासात पहिल्यांदाच घडतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' ही घोषणाच यातून पूर्णत्वास येतेय. 

आर्थिक संकटांशी समाना करणारी जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणं १७ एप्रिलपासून बंद आहेत. कर्मचाऱ्यांच्या समूहानं २५०० ते ५००० करोड रुपयांची तयारी जेट एअरवेजसाठी केलीय.