मुंबई : भूकंपाची बातमी ऐकून मनात धस्स होतं... परंतु, आज लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणारे भाजपा नेते 'भूकंपा'ची तीव्रतेने वाट पाहत आहेत... आणि त्याच्यावर जोक्स बनवायलादेखील ते सज्ज आहेत. वरिष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह आज सकाळी ट्विट केलं... 'भूकंपाची मजा घेण्यासाठी तयार राहा'... खरी मेख म्हणजे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या एका जुन्या विधानाला ट्रोल करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे... यातून राहुल गांधींची टर उडवण्याचा भाजप नेत्यांचा आणि समर्थकांचा हा प्रयत्न आहे.
'सरकार चर्चेपासून पळ काढतंय, मला बोलू द्याल तर पाहा भूकंप येईल', असं नोटबंदीनंतर संसदेत झालेल्या गोंधळावर बोलताना राहुल गांधींनी वक्तव्य केलं होतं. आपल्याला लोकसभेत बोलू दिलं जात नाही, असा आरोप राहुल गांधींनी केला होता. त्यानंतर राहुल गांधींची सोशल मीडियावर टरही उडवली गेली होती.
आज लोकसभेत अविश्वास प्रस्तावदरम्यान राहुल गांधी बोलणार आहेत. चर्चेची सुरुवात तेच करतील अशीही शक्यता आहे. अशावेळी अनेकांची नजर राहुल गांधींवर आहे... ते काय बोलतील याची उत्सुकता लोकांना 'अविश्वास प्रस्तावात कुणाला बहुमत मिळणार?' यापेक्षा जास्त आहे. कारण, सरकारकडे बहुमत असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय. यावरच भाजपानं आपली रणनीति बनवलीय.
राहुल गांधींना जोरदार ट्रोल करून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा भाजपाचा हा एक प्रयत्न आहे... सोशल मीडियावर लोक राहुल गांधींच्या 'त्या' भाषणाला टार्गेट करत आहेत जे अजून त्यांना द्यायचंय... त्यामुळेच ट्विटरवर #BhookampAaneWalaHai टॉप ट्रेन्डवर आहे. भाजप नेत्यांपासून ते समर्थकांपर्यंत सर्व जण राहुल गांधींची टर उडवण्यात व्यस्त झालेत.
तर दुसरीकडे राहुल गांधींसाठी ही कठिण परिस्थिती आहे. आज जर ते आपल्या वक्तव्यांवर ठाम राहू शकले नाहीत तर त्यांना हे भारी पडू शकतं.