कमलेश तिवारी हत्याकांड : रक्तानं माखलेले भगवे कपडे आणि पाकिस्तान कनेक्शन

जी १०३ क्रमांकाच्या या रुममधून रक्ताचे डाग असलेले भगवे कपडे आणि बेवारस बॅग पोलिसांनी ताब्यात घेतलीय

Updated: Oct 20, 2019, 05:28 PM IST
कमलेश तिवारी हत्याकांड : रक्तानं माखलेले भगवे कपडे आणि पाकिस्तान कनेक्शन  title=

लखनऊ : हिंदुत्ववादी नेता कमलेश तिवारीच्या हत्येचा कट रचणाऱ्यांना पोलिसांनी अटक करण्यात आली असून, मारेकऱ्यांचे रक्ताचे डाग असलेले भगवे कपडे पोलिसांना सापडलेत. दरम्यान, तिवारींच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन मारेकऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केलीय. हिंदुत्ववादी नेते कमलेश तिवारी यांची शुक्रवारी हत्या केल्यानंतर मारेकरी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या 'खालसा इन' हॉटेलचं सीसीटीव्ही पोलिसांनी जप्त केलंय. जी १०३ क्रमांकाच्या या रुममधून रक्ताचे डाग असलेले भगवे कपडे आणि बेवारस बॅग पोलिसांनी ताब्यात घेतलीय.

शेख असफाक हुसेन आणि पठाण मोईनुद्दीन अहमद यांच्या नावानं ही रुम बुक करण्यात आली होती. चेकआऊट न करताच ते दोघेही चारबाग परिसरातल्या या हॉटेलमधून गायब झाले. या दोघांचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलंय. या दोघांनीही तिवारींची हत्या करताना भगवे कपडे घातले होते, अशी माहिती डीजीपी ओ पी सिंह यांनी दिलीय.

कमलेश तिवारींच्या हत्येचा कट रचणारे सूत्रधार रशीद अहमद पठाण, मौलाना मोहसिन शेख आणि फैजान या तिघांना पोलिसांनी गुजरातच्या सूरतमधून अटक केलीय. त्यांच्या सांगण्यावरून तिवारींची हत्या करणारे मारेकरी रेल्वेनं लखनौला आले. चारबाग रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर, कमलेश यांचा पत्ता विचारत ते गणेशगंजला पोहोचले. गुगलची मदत घेऊन मारेकऱ्यांनी तिवारींची माहिती काढली. गुगल मॅपच्या मदतीनं हल्लेखोर तिवारींच्या घरापर्यंत खुर्शीदबागला पोहोचले, अशी माहिती आतापर्यंतच्या तपासात उघड झालीय.

त्याशिवाय या हत्येमागं पाकिस्तान कनेक्शन असल्याचाही संशय आहे

- लखनौमध्ये झालेल्या मर्डरचा कट सूरतमध्ये रचण्यात आला

- कटाचा सूत्रधार रशीद अहमद पठाण हा आधी दुबईत काम करत होता

- दुबईत तो ज्या आयटी कंपनीत कामाला होता, त्याचा मालक पाकिस्तानातल्या कराचीत राहतो

- म्हणूनच या हत्येमागं कराची कनेक्शन असल्याचा संशय एटीएसला आहे

दरम्यान, मृत कमलेश तिवारी यांच्या कुटुंबीयांनी रविवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. तिवारींची आई कुसुमा, पत्नी किरण, सत्यम, ऋषी आणि मृदूल हे तीन पुत्र यांचा त्यात समावेश होता. तिवारी यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांकडं करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कसून तपास करत असून, त्यातून आणखी काय माहिती पुढं येते, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.