बंगळुरु : जेडीएस-काँग्रेसच्या १३ आमदारांनी बंड करत मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारला मोठा हादरा दिला. २१ दिवस रंगलेले राजकीय नाट्यावर आता काही वेळात पडदा पडणार आहे. कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदानाला सुरुवात झाली आहे. सभागृहाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी जेडीएसच्या बंडखोर आमदारांना पुन्हा पक्षात घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तर पक्षाशी गद्दारी करणाऱ्याना पुन्हा पक्षात प्रवेश नाही. बंडखोर आमदारांना पुन्हा पक्षात घेणार नाही, असे काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या बंडखोर आमदारांना कायमचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्यात भाजप देखील स्थिर सरकार देईल का याबाबत प्रश्न चिन्ह आहे, असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. दरम्यान, २१ दिवसांपासून कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर थोड्याच वेळात पडदा पडल्यातच जमा आहे. बंडखोर आमदारांनी भाजपसोबत गेल्याचे दिसत आहे. त्यांनी कुमारस्वामी सरकारविरोधात मतदान केले आहे. त्यांनी पक्षाचा व्हिप नाकारल्याने त्यांच्यावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. आता मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. विधानसभेचे सभापती के. आर. रमेश कुमार यांनी आज कुमारस्वामी सरकारला विधानसभेत विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे.