सर्वांना 25 लाखांचा कॅशलेस विमा, 50%+ आरक्षण, समलैंगिक संबंधांना मान्यता अन्..; काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्दे

Key Points From Congress Manifesto 2024 Loksabha Elections: काँग्रेसने नवी दिल्लीमधील मुख्यालयातून घोषणा केलेल्या जाहीरनाम्यामध्ये समाजातील अनेक घटकांचा उल्लेख केलेला आहे. आर्थिक, सामाजिक स्तरावरील अनेक घोषणांचा समावेश यात आहेत. या घोषणा कोणत्या ते पाहूयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 5, 2024, 01:05 PM IST
सर्वांना 25 लाखांचा कॅशलेस विमा, 50%+ आरक्षण, समलैंगिक संबंधांना मान्यता अन्..; काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्दे title=
दिल्लीतून केली जाहीरनाम्याची घोषणा

Key Points From Congress Manifesto 2024 Loksabha Elections: काँग्रेसने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा घोषित केला आहे. या जाहीरनाम्यामध्ये आरक्षणासंदर्भातील अनेक तरतुदींचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच समलैंगिक संबंधांना मान्यता देण्यापासून सरसकट सर्व भारतीयांना 25 लाखांपर्यंतचा कॅशलेस विमा देण्यापर्यंत अनेक गोष्टींचा उल्लेख काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. या जाहीरनाम्यातील मुख्य मुद्दे कोणते ते पाहूयात...

50 टक्क्यांहून अधिक आरक्षण

लोकांनी प्रदेश, भाषा, जात याच्या पलीकडे जाऊन पहावं आणि लोकशाही मार्गाने काम करणारं सरकार निवडून द्यावं असं आवाहन काँग्रेसने केलं आहे.

काँग्रेस देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक स्तरावरील जनगणना करेल. तसेच जातीवर आधारित जनगणना केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं आहे.

एससी, एसटी आणि ओबीसींसाठी असलेल्या आरक्षणामध्ये 50 टक्क्यांहून अधिक वाढ करण्यासंदर्भात कायदेशीर मार्गाने तरतूद करु असं काँग्रेसने म्हटलं आहे.

सर्व जाती आणि समाजातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या घटकांसाठी नोकऱ्या, सरकारी संस्थांमध्ये कोणताही भेदभाव न करता 10 टक्के आरक्षण दिलं जाईल, असं आश्वासन काँग्रेसने दिलं आहे.

संविधानाचं संरक्षण

संविधानाच्या संरक्षणासाठी काँग्रेस पूर्णपणे प्रयत्नशील राहील असं सांगण्यात आलं आहे.

25 लाखांपर्यंत कॅशलेस विमा

राजस्थानप्रमाणे देशभरातील नागरिकांसाठी 25 लाखांपर्यंत कॅशलेस विमा योजना सुरु केली जाईल, असं काँग्रेसने जाहीरनाम्यात म्हटलं आहे.

दिवसाचा किमान रोजंदारी 400 रुपयांपर्यंत करणार

राष्ट्रीय स्तरावर प्रत्येकाला किमान दैनंदिन 400 रुपये उत्पन्न मिळेल, असं काँग्रेसने जाहीरनाम्यात नमूद केलं आहे.

नोकऱ्या निर्माण करणार

आर्थिक आघाड्यांवर नवसंकल्पच्या माध्यमातून अर्थार्जनासाठी नवीन धोरणे तयार केली जातील. विकास आणि नोकऱ्यांच्या निर्मितीसाठी धोरणात्मक बदल करण्याचं काँग्रेसचं आश्वासन.

समलैंगिक संबंधांना मान्यता

चर्चा आणि कायदेशीर तरतुदींनंतर काँग्रेस समलैंगिक जोडीदारांच्या विवाहसंदर्भातील तरतुदींसाठी सकारात्मक निर्णय घेईल असंही जाहीरनाम्यात म्हटलं आहे.

शिष्यवृत्ती दुप्पट करणार, आरक्षित समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात पाठवण्यासाठी अर्थसहाय्य

ओबीसी, एससी, एसटी आरक्षणाअंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये दुप्पटीने वाढ करु. एससी आणि एसटीमधील आरक्षित विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाईल. तसेच या विद्यार्थ्यांनी पीएचडीपर्यंतचं शिक्षण घ्यावं यासाठी प्रयत्न केले जातील असं काँग्रेसने म्हटलं आहे.

एससी, एसटी समाजातील घटकांना घरं बांधण्यासाठी अर्थसहाय्य

एससी, एसटी समाजातील घटकांना घरं बांधण्यासाठी, उद्योग सुरु करण्यासाठी संस्थांच्या माध्यमातून वित्तपुरवठा करण्याची सोय उपलब्ध करुन दिली जाईल, असं काँग्रेसने म्हटलं आहे.

 

एकीकडे काँग्रेसने अनेक आश्वासनं आपल्या जाहीरनाम्यात दिली आहेत तर दुसरीकडे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या जाहीरनाम्याची घोषणा केलेली नाही.