Video: 'आम्ही तुमच्या आया-बहिणींचे घाणेरडे...'; ममतांच्या नेत्याची आंदोलकांना जाहीर सभेत धमकी

Kolkata Rape Murder Case Mamata Banerjee Leader Video: ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोलकात्यामधील आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयामधील प्रकरणानंतर राज्यभर आंदोलनं सुरु असतानाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 3, 2024, 10:08 AM IST
Video: 'आम्ही तुमच्या आया-बहिणींचे घाणेरडे...'; ममतांच्या नेत्याची आंदोलकांना जाहीर सभेत धमकी title=
बंगला भाजपाने हा व्हिडीओ केला शेअर

Kolkata Rape Murder Case Mamata Banerjee Leader Video: पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसने आपल्या माजी नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी केली आहे. अतिश सरकार असं या माजी नगरसेवकाचं नाव असून त्याचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं आहे. अतिश सरकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलमध्ये 9 ऑगस्ट रोजी 31 वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याच्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना अतिशने धमकावलं होतं. या बालत्कार आणि हत्या प्रकरणानंतर राज्यातील वातावरण तापलेलं असतानाच तृणमूलच्या या नगरसेवकाने आंदोलन कर्त्यांच्या आई, बहिणीचा उल्लेख करत जाहीरपणे धमकावलं होतं.

घाणेरडे पोस्टर्स...

पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये नॉर्थ 24 परगणा येथील अशोकनगरमधील जाहीर सभेमध्ये अशित पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीका करणाऱ्यांना धमकावताना दिसत आहे. "जे लोक दिदींवर टीका करत आहेत, त्यांना शिव्या देत आहेत. त्यांचं करेक्ट असॅसिनेशन करत आहेत त्यांना सांगू इच्छितो की आम्ही तुमच्या आया-बहिणींचे घाणेरडे पोस्टर्स बनवून तुमच्या घराच्या भिंतीवर लावू. ते तुम्ही काढू शकणार नाही. हा दिवस लवकरच येईल," असं म्हटल्याचं 'द टेलिग्राफ'च्या वृत्तात म्हटलं आहे.

आम्ही त्रास देण्यास सुरुवात केली तर...

"आम्ही तुम्हाला तुम्ही राहता त्या परिसरात सकाळ, संध्याकाळ त्रास देण्यास सुरुवात केली तर तुम्ही घराबाहेर पडू शकाल का?" असा प्रश्न जाहीर भाषणामध्ये अतिशने विचारल्याचं 'द टेलिग्राफ'च्या वृत्तात म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या वर्धापनदिनाच्या दिवशी ममता बॅनर्जींनी बंगलाला बदनाम करणाऱ्यांविरुद्ध आवाज उठवण्यास सांगितलं होतं. याचाचसंदर्भ अतिशने आपल्या भाषणाच्या सुरुवातीला देताना, "दिदींना आम्हाला आवाज उठवायला सांगितलं आहे," असंही म्हटलं आहे.

भाजपाची टीका

हा व्हिडीओ शेअर करताना पश्चिम बंगालमधील भाजपाने, "यावरुन ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाचं अपयश दिसून येत आहे. त्यांच्या अपयशामुळेच अशाप्रकारे कायद्याचा धाक नसणारं वातावरण तयार झालं आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये महिला सुरक्षित नाहीत," असं म्हटलं आहे.

पक्षाने कारवाई करताना काय म्हटलं?

तृणमूलचे नेते कुणाल घोषण यांनी अशितचं निलंबन करण्यात येत असल्याची घोषणा एक्स अकाऊंटवरुन केली. "अशोकनगर कल्याणनगर महानगरपालिका परिसरातील तृणमूलच्या नेत्याने केलेल्या विधानाचा पक्ष निशेध करत आहे. आंदोलनकर्त्यांच्या आई आणि बहिणींबद्दल केलेलं हे विधान असंवेदनशील आणि अयोग्य आहे. या नेत्याची ओळख पटली असून त्याला एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे," असं घोष यांनी म्हटलं आहे. 

सेलिब्रिटीही रस्त्यावर

कोलकात्यामध्ये मागील चार आठवड्यांपासून आंदोलन सुरु आहे. आर. जी. कर येथील बालत्कार आणि हत्या प्रकरणामध्ये तपासामध्ये गोंधळ घालण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनामध्ये रविवारी बंगाली मनोरंजनसृष्टीमधील अनेक कलाकारांनी रस्त्यावर उतरुन सहभाग नोंदवला. कोलकात्यामध्येही रविवारी मोर्चे निघाले.