'मॅजिक' नाही 'ट्रॅजिक' : हात-पाय बांधून 'जादूगरा'ची नदीत उडी, मृतदेह हाती

प्रसिद्ध जादूगर हॅरी हुडिनी याच्या १०० वर्षांपूर्वीच्या एका प्रसिद्ध जादूच्या प्रयोगाची नक्कल करण्याचा विडा चंचलनं घेतला होता

Updated: Jun 18, 2019, 01:01 PM IST
'मॅजिक' नाही 'ट्रॅजिक' : हात-पाय बांधून 'जादूगरा'ची नदीत उडी, मृतदेह हाती title=

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये जादूचे प्रयोग करताना एका जादूगाराला आपल्या जीवाला मुकावं लागलंय. जादूचा प्रयोग करून दाखवताना रविवारी हा जादूगर हुगळी नदी बेपत्ता झाला होता. सोमवारी हावडाजवळ त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला. या ४१ वर्षीय जादूगाराचं नाव चंचल लाहिरी असं आहे. त्याला अनेक जण 'मॅनड्रेक' नावानंही ओळखतात. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध जादूगर हॅरी हुडिनी याच्या १०० वर्षांपूर्वीच्या एका प्रसिद्ध जादूच्या प्रयोगाची नक्कल करण्याचा विडा चंचलनं घेतला होता. ही नक्कल त्याच्या जीवावर बेतलीय. या जादूच्या प्रयोगात स्वत:ला लोखंडी साखळदंडानं बांधून घेत चंचलनं एका नावेतून स्वत:ला नदीच्या पाण्यात झोकून दिलं होतं. या साखळदंडाला सहा टाळेही लावलेले होते. परंतु, स्वत:ला सोडवून बाहेर येण्यात मात्र चंचलला अपयश आलं... नदीच्या पाण्यात तो पाहता-पाहता बेपत्ता झाला. 

रविवारी, हा जादूचा प्रयोग पाहण्यासाठी आलेल्या दर्शकांनी याची माहिती पोलिसांना दिली. काही लोक नदी किनाऱ्यावरून तर काही लोक हावडा ब्रिजवर उभे राहून हा प्रयोग पाहत होते. 'मी यशस्वी झालो तर मॅजिक होईल नाहीतर ट्रॅजिक होईल' असं या प्रयोगाआधी माध्यमांशी बोलताना जादूगर चंचल यांनी म्हटलं होतं... आणि खरोखरच ही घटना 'मॅजिक' नाही तर 'ट्रॅजिक' ठरली. लाहिडी यांच्या भावाला मृतदेहाची ओळख पटली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २० वर्षांपूर्वीही असाच एक खेळ करत जादूगर चंचल लाहिडी यांनी एका काचेच्या पेटीत बंद होत नदीत उडी घेतली होती. परंतु, तेव्हा मात्र ते सहीसलामत बाहेर येण्यात यशस्वी ठरले होते.