मुंबई : भारतात मुलींसाठी लग्नाची मर्यादा कमीत कमी 18 वर्ष आणि मुलांसाठी 21 वर्ष आहे. विधी आयोगानं लग्नासाठी मुलांची वयोमर्यादा 21 वरून 18 करण्याचा सल्ला दिलाय. लग्नामध्ये मुला-मुलींच्या वयांतलं अंतर दूर व्हायला हवं, असं आयोगानं म्हटलंय. इतकंच नाही तर लग्नानंतर जोडप्यानं मिळवलेल्या संपत्तीत पत्नीचाही सहभाग असतो... त्यामुळे घटस्फोटानंतर तिला संपत्तीतील समान हिस्सा मिळायला हवा, असंही विधि आयोगानं सुचवलंय.
विवाहात महिला आणि पुरुषांच्या वयातील अंतर राखणं याचाच अर्थ 'पत्नी पतीहून लहान असायला हवी' या समजुतीला प्रोत्साहन देण्यासारखं आहे. 18 व्या वर्षीच मुलांना मतदानाचा अधिकार आहे तर याच वयात त्यांना त्यांचा जोडीदार निवडण्यासाठीही सक्षम मानायला हवं.
भारतीय प्रौढ कायदा 1875 नुसार महिला आणि पुरुषांना समान वयात लग्नासाठी कायदेशीर रुपात मान्यता मिळायला हवी. लग्नाच्या वेळी पती - पत्नीच्या वयात अंतर असायला हवं, याला कोणताही कायदेशीर आधार नाही कारण लग्न करणारे दोन्ही जण समान आहेत.
सध्या, कायद्यानुसार महिलांसाठी लग्नाचं वय कमीत कमी 18 वर्ष आहे तर पुरुषांसाठी कमीत कमी 21 वर्ष आहे. ही व्यवस्था संपुष्ठात यायला हवी, असं विधि आयोगाचं म्हणणं आहे.