LIC च्या विमा योजनेत बदल; नव्या प्लॅननुसार कसा असेल परतावा? पाहूनच घ्या

LIC New Scheme: पगाराची रक्कम योग्य ठिकाणी गुंतवल्या आणि त्यातही योग्य वयात योग्य गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा उतारवयातच नव्हे तर, संपूर्ण आयुष्यात घेता येतो. 

सायली पाटील | Updated: Nov 27, 2023, 02:25 PM IST
LIC च्या विमा योजनेत बदल; नव्या प्लॅननुसार कसा असेल परतावा? पाहूनच घ्या  title=
LIC New Scheme 2023 guaranteed return

LIC New Scheme: LIC किंवा लाइफ इंश्योरंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे नाव अनेकांसाठी नवं नाही. कैक दशकांपासून देशात विमासेवा पुरवणाऱ्या आणि सरकारी अख्त्यारित येणाऱ्या या संस्थेकडून आतापर्यंत भारतातील अनेक नागरिकांना आर्थिक स्थैर्य देणाऱ्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. याच अर्थसहाय्याच्या बळावर अनेकांन आपली स्वप्नही पूर्ण केली आहेत. यातच आता भरीस भर म्हणजे एलआयसीचा नवा उपक्रम. 

LIC कडून सध्या फिनटेक सुरु करण्यच्या विचारावर भर देण्यात येत आहे. ज्यामुळं ग्राहकांना आता गुंतवणुकीचे इतरही पर्याय उपलब्ध होणार आहेत. LIC च्या अध्यक्षपदी असणाऱ्या सिद्धार्थ मोहंती यांनी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना येत्या काळात या संस्थेकडून काही नव्या योजना ग्राहकांपुढं सादर करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. 

2023- 2024 या आर्थिक वर्षादरम्यान पॉलिसी प्रिमियममध्ये दुहेरी आकड्यांमध्ये वाढ करण्यासाठी येत्या तीन ते चार महिन्यांमध्ये नव्या योजना आखल्याचं स्पष्ट करत डिसेंबर महिन्याच्या शेवटापूर्वीच एक योजना सर्वांसमक्ष सादर करण्यात येईल असं ते म्हणाले. 

मोहंती यांच्या माहितीनुसार एलआयसीच्या नव्या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना परताव्याची आणि त्यातूनही चांगल्या परताव्याची हमी असेल. शिवाय पॉलिसी मॅच्योर झाल्यानंतर पॉलिसीधारकाला आयुष्यभर विमा रकमेतील 10 टक्के रक्कम मिळेल. ही नवी योजना इतर योजनांना चांगलीच टक्कर देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सध्याची पिढी, गुंतवणुकीकडे असणारा त्यांचा कल आणि 20 ते 25 वर्षांमध्ये मिळणारा परतावा या साऱ्याच्या बाबतीत एलआयसीची ही योजना भविष्यातील आखणीच्या दृष्टीनं एक उत्तम पर्याय ठरणार आहे. 

हेसुद्धा पाहा : खनिजांचा साठा, अनेक गोष्टी करण्यासाठी वाव... विकायला काढलंय अख्खं बेट; खरेदी करणार का? 

आता एका क्लिकवर LIC 

ग्राहकांपर्यंत LIC च्या विमा योजना पोहोचवण्यामध्ये एजंट मोठी भूमिका बजावतात. पण, आता मात्र इथंही काही बदल पाहायला मिळणार आहेत. ज्यामुळं एका क्लिकवर या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. LIC च्या विमा योजनांचा लाभ घेण्यासाठी आता घरबसल्या मोबाईलमधूनच सर्व कामं होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.