'भगवान राम स्वप्नात येऊन म्हणाले, मला वाचव! या लोकांनी...'; मंत्र्याच्या विधानाने वाद

Lord Ram Came In My Dream Education Minister: एका जाहीर कार्यक्रमामध्ये शिक्षकांसमोर बोलत असताना शिक्षण मंत्र्यांनी हे विधान केल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 19, 2023, 02:48 PM IST
'भगवान राम स्वप्नात येऊन म्हणाले, मला वाचव! या लोकांनी...'; मंत्र्याच्या विधानाने वाद title=
जाहीर कार्यक्रमात बोलताना केलं हे विधान

Lord Ram Came In My Dream Education Minister: बिहार सरकारमधील शिक्षण मंत्री चंद्रशेखर यादव यांनी केलेल्या एका विधानामुळे ते वादात अडकले आहेत. यापूर्वीही वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेल्या यादव यांनी पुन्हा एक असेच विधान केले आहे. सुपौल येथे एका जाहीर कार्यक्रमामध्ये, "भगवान राम माझ्या स्वप्नात आले होते आणि त्यांनी मला हे लोक आम्हाला बाजारात विकत आहेत. तुम्ही मला बाजारात विकण्यापासून वाचवा, असं प्रभू श्रीराम म्हणाले," असं विधान यादव यांनी केलं आहे.

शबरीची उष्टी बोरं खावून समानतेचा संदेश

बिहारचे शिक्षण मंत्री चंद्रशेखर यादव यांनी भगवान श्री रामांनी शबरीची उष्टी बोरं खाल्ली होती. मात्र आज शबरीच्या मुलाला मंदिरामध्ये जाता येत नाही. हे फारच खेदजनक आहे. राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांनाही आडवलं जातं. मंदीर गंगाजल वापरुन धुतलं जातं. ईश्वराने शबरीची उष्टी बोरं खावून समानतेचा संदेश दिला होता, असं यादव यांनी म्हटलं.

प्रभू राम हे जाती व्यवस्थेच्या विरोधात होते

यादव यांनी भगवान जाती व्यवस्थेच्या विरोधात होते असं म्हटलं. त्यांनी विचार केला असेल की आपण तिची (शबरी) खाल्ली तर जगही त्याचं अनुकरण करेल. मात्र असं झालं नाही. त्यांनी देवाला एकट्याला सोडून दिलं. त्यांना केवळ धूप-अगरबत्ती दाखवली जाते. त्यांचं अनुकरण केलं जात नाही, असं यादव यांनी म्हटलं.

स्वप्नात आले अन्...

शिक्षण मंत्री पिपरा येथील रामपूर गावामधील माजी शिक्षक संघ अध्यक्ष लक्ष्मी यादव यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. लक्ष्मी यादव यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी त्यांच्या स्वप्नाबद्दल सांगितलं. "भगवान राम माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले, हे बघ चंद्रशेखर आम्हाला या लोकांनी बाजारात विकलं आहे. मला वाचव," असं विधान चंद्रशेखर यादव यांनी केलं. 

मोहन भागवत यांचा उल्लेख

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचाही उल्लेख चंद्रशेखर यादव यांनी केला. "भगवान श्री राम हे मर्यादा पुरुषोत्तम होते. ते जाती व्यवस्था संपवण्याचा संदेश देऊन निघून गेले. आम्ही एकदा हे बोललो तर लोकांनी आमची जीभ कापून नेणाऱ्यांना 10 कोटींचं बक्षीस जाहीर केलं. मात्र मोहन भागवत यांच्याविरोधात 10 रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं नाही," असंही चंद्रशेखर यादव म्हणाले.

शिक्षकांच्या सन्मानाला धक्का लावणार नाही

शिक्षकांच्या सन्मानाला मंत्री म्हणून मी कोणतीही धक्का लावणार नाही. काही डोकं फिरलेली माणसं येऊन काहीतरी बोलून निघून जातील. मात्र तुम्ही त्यांचा विचारही करु नका, असा सल्लाही चंद्रशेखर यादव यांनी दिला.