जुलैच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा; गॅस सिलेंडरच्या दरात कपात, असे असतील नवे दर

Gas Cylinder Price News Today: जुलै महिन्यात केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 1, 2024, 08:00 AM IST
जुलैच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा; गॅस सिलेंडरच्या दरात कपात, असे असतील नवे दर title=
LPG Cylinder Price Slashed by Rs 30 Check Revised Rates in mumbai maharashtra

LPG Cylinder Price Cut: जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार, व्यावसायिक सेलेंडर जवळपास 31 रुपयांनी स्वस्त झाला आहे. चार महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस स्वस्त झाला आहे. व्यावसायिक गॅसमध्ये सलग चौथ्या महिन्यात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर, एकीकडे 9 मार्चपासून घरगुती सिलेंडरचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले आहेत. 10 महिन्यांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 300 रुपयांची कपात करण्यात आली होती. 

व्यावसायिक गॅसच्या दरात 1 जुलै रोजी पहाटे 6 वाजण्याच्या दरम्यान घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळं महागाईने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळालेला आहे. 19 किलो वजनाचा व्यावसायिक सिलेंडर जवळपास 30 ते 30 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळं आता मुंबईत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1598 रुपये इतकी झाली आहे. देशातील इतर शहरांत ही किंमत वेगवेगळी असू शकते. दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर 1646 रुपयांना मिळणार आहे. चेन्नईत 1809.50 रुपये तर, कोलकातामध्ये 1756 रुपयांना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणार आहे.

चार महानगरांमध्ये ही नवीन दरवाढ लागू करण्यात आली आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरचे नवे दर लागू झाले आहेत. सलग चौथ्या महिन्यात ही घट नोंदवण्यात आली आहे. या कालावधीत चारही महानगरांमध्ये गॅस सिलेंडर 150 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाहीये. 

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मार्चपासून कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. 9 मार्च रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 100 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यापूर्वी 30 ऑगस्टला देशभरात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात  200 रुपयांची कपात झाली होती. गेल्या 10 महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल झालेले पाहायला मिळाले नाहीत. 1 मार्च 2023 रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे. हा बदलदेखील 6 जुलै 2022 नंतर पाहायला मिळाला होता. गेल्या 2 वर्षात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत चारवेळा बदल पाहायला मिळाला आहे. मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरचे दर 802.50 रुपये इतके आहेत.