कर्नाटकचा सत्तासंघर्ष निर्णायक वळणावर; सोमवारचा दिवस महत्वाचा

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ बंगळुरुमध्ये दाखल झाले आहेत.

Updated: Jul 14, 2019, 09:05 PM IST
कर्नाटकचा सत्तासंघर्ष निर्णायक वळणावर; सोमवारचा दिवस महत्वाचा title=

प्रताप नाईक, झी मीडिया, बंगळुरु : काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची समजूत काढण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ बंगळुरुमध्ये दाखल झाले आहेत. कर्नाटकमधील राजकीय घडामोडींसाठी सोमवारचा दिवस महत्वाचा असणार आहे.  कॉंग्रेसचे सरकार वाचवण्याची जबाबदारी कमलनाथ यांच्यासारख्या अनुभवी नेत्याकडे कॉंग्रेसने सोपवली आहे. 

कर्नाटकमधील काँग्रेसचे नाराज वरिष्ठ नेता राम लिंगा रेड्डी यांना भेटून समजूत काढण्याचा प्राधान्यानं प्रयत्न असणार आहे. जर रेड्डी यांची समजूत काढण्यात यश आले तर चार आमदार पुन्हा काँग्रेसमध्ये येऊ शकतात. कमलनाथ दोन दिवस कर्नाटकात असणार आहेत. दुसरीकडे भाजपा नेता आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी कुमारस्वामी सरकारवर हल्लाबोल केला आहे. जनता या सरकारला कंटाळली असून यांनी काहीच विकासकामे केली नसल्याचा प्रहार केला. 

कर्नाटकमधील आणखी ५ बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. के. सुधाकर, एमटीबी नागराज, रोशन बेग, आनंद सिंग आणि मुनीरत्न अशी त्यांची नावे आहेत. सर्वोच्च न्यायालयात याआधी याचिका दाखल करणाऱ्या १० आमदारांसोबत आमची देखील नावे समाविष्ट करून घ्यावीत, अशी याचिका त्यांनी केली. विधानसभा अध्यक्ष आमचे राजीनामे मंजूर करत नाही, ते जाणीवपूर्वक विलंब लावत असल्याचा त्यांचा आक्षेप आहे. 

कर्नाटक सरकारमधील मंत्री डी. के. शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी बंडखोर आमदार एमटीबी नागराज यांची भेट घेतल्यानंतर नागराज राजीनाम्याचा फेरविचार करण्यासाठी तयार असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे नागराज भाजपाच्या गळाला लागलेत अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

जेडीएस, काँग्रेस आणि भाजपा या तिन्ही पक्षांनी आपले आपले आमदार सुरक्षितस्थळी ठेवले आहेत. विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी कुठलाच आमदार फूटू नये यासाठी प्रत्येक पक्ष दक्ष आहे.