महाविकासआघाडीकडून आजच सत्तास्थापनेचा दावा, २६ नोव्हेंबरला शपथविधी?

महाविकासआघाडी राज्यात सरकार स्थापन करणार...

Updated: Nov 22, 2019, 08:56 AM IST
महाविकासआघाडीकडून आजच सत्तास्थापनेचा दावा, २६ नोव्हेंबरला शपथविधी? title=

मुंबई : महाविकासआघाडीकडून आजच सत्तास्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता आहे. २६ नोव्हेंबरला संविधान दिनाचा मुहूर्त साधत शपथविधी व्हावा, अशी काँग्रेसची मागणी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आजच महाविकासआघाडीचे नेते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. काल उशीरा रात्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली होती. बैठकांमध्ये सत्तेचा फॉर्मुला देखील ठरल्याचं सूत्रांची माहिती आहे.

राज्यातल्या सत्तास्थापनेच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. सरकार स्थापनेवर चर्चा करण्यासाठी आज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीला काँग्रेसकडून के.सी. वेणूगोपाल, मल्लिकार्जुन खरगे आणि अहमद पटेल उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी २ वाजता महाविकास आघाडीची अंतिम बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. नवे सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया आजच सुरू करण्यात येण्याची चिन्ह आहेत. 

राज्याच्या सत्तास्थापनेचा पेच सोडवण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकासआघाडीसाठी रात्रीही खलबतं सुरु होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मध्यरात्री सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्या सोबत आमदार आदित्य ठाकरे तसंच संजय राऊतही उपस्थित होते.

सत्तास्थापनेसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील सहमतीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पवार-ठाकरेंच्या भेटीत सत्तावाटपावर चर्चा झाल्याचं समजतंय. सुमारे सव्वा तास दोघांमध्ये चर्चा सुरु होती. त्यानंतर उद्धव ठाकरे मातोश्रीवर परतले. मात्र भेटीनंतर कोणीही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रीया दिली नाही.. ही भेट सकारात्मक झाल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले. 

महाविकासआघाडीच्या बैठकीआधी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची आज दुपारी १ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत विधीमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल. सर्व आमदारांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. विधीमंडळ पक्षनेते पदासाठी बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे. दिल्लीवरून येत असलेले निरीक्षक पक्षाच्या आमदारांची मतं जाणून घेऊन त्याचा अहवाल दिल्लीला कळवतील. 

महाविकासआघाडीचा सत्तेचा फार्म्युला : 

शिवसेना: 11 कॅबिनेट, 5 राज्यमंत्रिपदं( मुख्यमंत्रीपद)
राष्ट्रवादी: 11 कॅबिनेट, 4 राज्यमंत्री पदं( उपमुख्यमंत्रीपद)
काँग्रेस: 9 कॅबिनेट, 3 राज्यमंत्रीपदं( उपमुख्यमंत्रीपद)

16:15:12 या फॉर्मुलावर सहमती.

मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत झाल्याचं देखील समोर आलं आहे. विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे.

महामंडळ

शिवसेना :27
राष्ट्रवादी :25
काँग्रेस : 25
सिद्धिविनायक ट्रस्ट : शिवसेना
शिर्डी देवस्थान : काँग्रेस-राष्ट्रवादी