Mother Kept Eating In Same Plate: आई हे वेगळंच रसायन आहे असं अनेकजण म्हणतात. म्हणजे आई (Mother) जे आपल्या लेकरांसाठी करते ते जगातील कुठलीच व्यक्ती करु शकत नाही. आपल्या मुलांसाठी आई आयुष्यभर झटक असते. या संघर्षात अनेक गोष्टींचा ती त्याग करताना दिसते. अशीच एक भावूक करणारी गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एखादी आई आपल्या मुलावर किती प्रेम करु शकते याचा अंदाज या गोष्टीमधून बांधता येतो. आपल्या आईच्या मृत्यूनंतर एका मुलाने केलेल्या ट्वीटवरुन हा विषय चर्चेत आला आहे.
झालं असं की, सोशल मीडियावर विक्रम नावाच्या एका युझरने एका थाळीचा फोटो शेअर केला आहे. या थाळीच्या फोटोला दिलेली कॅप्शन सध्या चर्चेत आहे. ही प्लेट माझ्या अम्माची (आईची) आहे, असं या विक्रमने या कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. ती मागील दोन दशकांपासून या एकाच थाळीत जेवायची. ही आकाराने फार छोटी थाळी आहे, असं या थाळीचं वर्णन करताना विक्रम म्हणतो. तिने केवळ मला आणि माझ्या भाचीला या थाळीत खाण्याची परवानगी दिली होती, असंही विक्रम म्हणतो. मात्र या पोस्टच्या कॅप्शनमधील शेवटची ओळ ही आई आणि मुलाचं भावनिक नातं सांगणारी आहे.
शेवटच्या ओळीमध्ये विक्रमने त्याची आई 20 वर्ष या प्लेटमधूनच का खायची यामागील कारण सांगितलं आहे. "तिच्या मृत्यूनंतर मला माझ्या बहिणीने सांगितलं की ही थाळी मी लहानपणी एका स्पर्धेत बक्षिस म्हणून जिंकली होती," असं विक्रमने पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे. ही कॅप्शन वाचून लोकांना समजलं की ही महिला असं का करायची. आपल्या मुलाने लहानपणी बक्षिस म्हणून ही थाळी जिंकली होती, म्हणूनच ही मायमाऊली या थाळीमध्येच रोज जेवायची. बरं हे असं ती तब्बल 20 वर्ष करत होती. आपल्या मुलाने केलेल्या कामगिरीबद्दल तिचा वाटणारा अभिमान ती असा अनोख्या प्रकारे व्यक्त करत होती.
This is Amma's plate.. she used to eat in this for the past 2 decades.. it's a small plate.. she allowed only myself and chulbuli (Sruthi, my niece) only to eat in this other than her.. after her demise only I came to know through my sister, that this plate was a prize won by me pic.twitter.com/pYs2vDEI3p
— Vikram S Buddhanesan (@vsb_dentist) January 19, 2023
सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांना त्यांचे अश्रू अनावर झाले आहेत. लोकांनी आईचं हृदय किती मोठं असतं हे यावरुन दिसून येतं असं म्हटलं आहे. एकाने अशा आईला आमचा सलाम आहे, असं म्हटलंय. तर अन्य एका व्यक्तीने आईच्या रुपात देव सगळ्यांबरोबर आहे, असं म्हटलं आहे.